Gautam Gambhir : भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर चाहत्यांचा संताप; गौतम गंभीरला स्टेडियममध्येच घेरलं, पाहा VIDEO

Fans Chanting Gautam Gambhir Hay Hay Video Viral : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मायदेशातील कसोटी मालिका भारतीय क्रिकेट संघासाठी एका वाईट स्वप्नासारखी ठरली. गुवाहाटी कसोटीत तब्बल ४०८ धावांच्या मोठ्या फरकाने मिळालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर, भारताला २-० अशा फरकाने क्लीन स्वीप स्वीकारावा लागला. या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट विश्वावर एक मोठा डाग लागला असून, चाहत्यांचा संताप आता थेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर व्यक्त होत आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
चाहत्यांनी मैदानावरच गंभीरवर व्यक्त केला संताप –
गुवाहाटी कसोटीतील दारुण पराभवानंतर गौतम गंभीर यांना चाहत्यांच्या थेट रोषाला सामोरे जावे लागले. सामना संपल्यानंतर, हार पत्करून निराश झालेले प्रेक्षक स्टेडियममधून बाहेर पडत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये चाहत्यांचा एक मोठा समूह जोरजोरात ‘गौतम गंभीर हाय हाय’ अशा घोषणा देताना दिसत आहे. या दृश्यावरून हे स्पष्ट होते की, चाहत्यांचा संयम संपला आहे आणि ते या सर्वात मोठ्या कसोटी पराभवासाठी थेट प्रशिक्षक गंभीर यांना जबाबदार धरत आहेत.
🚨: Angry Fans chanted “Gautam Gambhir Hay Hay” in front of Gautam Gambhir after India’s embarrassing Test series loss at Guwahati stadium. pic.twitter.com/7gq4T1lq8j
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) November 26, 2025
रणनीती आणि तयारीवर प्रश्नचिन्ह –
हा आक्रोश केवळ पराभवाचा नाही, तर ज्या पद्धतीने टीम इंडिया हरली आहे, त्याबद्दल आहे. पहिल्या डावात भारतीय फलंदाजांचे केवळ २०१ धावांत गारद होणे आणि दुसऱ्या डावात ५४९ धावांच्या मोठ्या लक्ष्यासमोर फक्त १४० धावांत गुंडाळले जाणे, यावरून संघाची तयारी आणि रणनीती मोठ्या प्रश्नांच्या घेऱ्यात आली आहे. गंभीर यांच्या नेतृत्वाखाली भारताने मागील १८ कसोटी सामन्यांपैकी १० मध्ये पराभव स्वीकारला आहे.
गौतम गंभीर यांची नाराजी आणि जबाबदारी –
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी या दारुण पराभवानंतर तीव्र निराशा व्यक्त केली. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गंभीर यांनी स्पष्ट केले की, संघाच्या खराब कामगिरीची जबाबदारी केवळ खेळाडूंवर टाकली जाऊ शकत नाही. ते म्हणाले, “माझ्या भविष्याचा निर्णय बीसीसीआय घेईल. इंग्लंडमधील विजय आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसारखी यशोगाथा माझ्या नावासोबत जोडली गेली आहे, पण आजच्या पराभवाची जबाबदारी सामूहिक आहे आणि तिची सुरुवात माझ्यापासून होते.”





