“बांगलादेशी घुसखोरांचा ठावठिकाणा सांगा आणि 1,111 रुपयांचे बक्षीस मिळवा”; कोणी केलं आवाहन, पाहा…

Bangladeshi people : देशासह महाराष्ट्रात देखील बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट वाढला असून अश्या घुसखोरांविरुद्ध कारवाईचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होत. ‘घुसखोरांना शोधून त्यांना मायदेशी पाठवणे, घुसखोरांना रोखण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. पुणे-मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात येत आहे. याबाबतचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत’, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली होती.
पुणे-मुंबई सारख्या महत्वाच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात खुसखोरी वाढत असल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे. पोलिसांनी देखील कडक कारवाई करून अनेक बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. अश्यातच अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाराही बांग्लादेशी नागरिक असल्याचं समोर आलं होतं. यानंतर पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना शोधण्याची मोहीम अधिक तीव्र केली आहे.
माहिती देणाऱ्यास मिळणार १ हजार १११ रुपयांचं बक्षीस :
उल्हासनगर शहरात आतापर्यंत १२ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे माजी नगरसेवक राजेंद्र सिंग भुल्लर महाराज यांनी उल्हासनगर शहरात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची माहिती देणाऱ्यास १ हजार १११ रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. तसंच कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे कामावर ठेवण्याआधी त्याची नीट चौकशी करा असेही आवाहन व्यापाऱ्यांना बॅनरच्या माध्यमातून त्यांनी केले आहे. हे कट-आऊट्स शहरात चर्चेचे विषय ठरू लागले आहेत.
घुसखोरांना मदत करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा :
महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट झाल्याने राज्याची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळेच बांगलादेशी घुसखोरांविरोधात शोध मोहीम राबवा आणि घुसखोरांना सहाय्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले आहे.






