B.P.Singh Passes Away : मनोरंजनविश्वावर शोककळा.! ‘CID’चे निर्माते बी.पी. सिंह यांचं निधन
बी. पी. सिंह म्हणजेच 'ब्रिजेंद्र पाल सिंह' यांनी भारतीय टेलिव्हिजनवर गुन्हेगारी आणि रहस्यप्रधान मालिकांची स्वतंत्र ओळख निर्माण केली. ‘सीआयडी’ आणि ‘आहट’ या लोकप्रिय मालिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांना थरारक कथांचा वेगळाच अनुभव दिला.

B.P.Singh Passes Away : छोट्या पडद्यावर गुन्ह्यांचा थरार उभा करणारे, रहस्याच्या प्रत्येक वळणावर प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आणि ‘सीआयडी’सारखी अजरामर मालिका घराघरांत पोहोचवणारे ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक बी. पी. सिंह यांचं निधन झालं आहे.
२७ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने भारतीय टेलिव्हिजन विश्वाला मोठा धक्का बसला असून, अनेक वर्षं त्यांच्या कलाकृतींवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. २८ ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बी. पी. सिंह म्हणजेच ‘ब्रिजेंद्र पाल सिंह’ यांनी भारतीय टेलिव्हिजनवर गुन्हेगारी आणि रहस्यप्रधान मालिकांची स्वतंत्र ओळख निर्माण केली. ‘सीआयडी’ आणि ‘आहट’ या लोकप्रिय मालिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांना थरारक कथांचा वेगळाच अनुभव दिला.
दोन दशकं गाजलेली ‘सीआयडी’; आजही प्रेक्षकांच्या मनात कायम
बी. पी. सिंह यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेली कलाकृती म्हणजे ‘सीआयडी’. १९९८ मध्ये सोनी टीव्हीवर सुरू झालेल्या या मालिकेने गुन्हेगारी तपास, रहस्य, संशय आणि अनपेक्षित वळणं यांची सांगड घालत प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवलं. २०१८ पर्यंत जवळपास दोन दशकं ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहिली.
एसीपी प्रद्युम्न, इन्स्पेक्टर दया आणि इन्स्पेक्टर अभिजीत यांसारख्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. मालिकेतील तपासाची पद्धत, गुन्हेगारांचा शोध आणि लक्षात राहणारे संवाद यामुळे ‘सीआयडी’ लोकप्रिय संस्कृतीचा एक भाग बनली.
पडद्यामागचे निर्मातेच नव्हे, तर पडद्यावरचेही प्रभावी व्यक्तिमत्त्व
बी. पी. सिंह यांनी ‘सीआयडी’च्या निर्मिती आणि दिग्दर्शनासोबतच या मालिकेत अभिनयही केला होता. त्यांनी डीसीपी शमशेर सिंग चित्रोले ही व्यक्तिरेखा साकारली. या पात्राची वेगळी शैली आणि तऱ्हेवाईक स्वभाव यामुळे मालिकेत त्यांच्या अभिनयाचीही स्वतंत्र ओळख निर्माण झाली.
डेहराडून ते पुण्याची FTII; कॅमेरामन म्हणून सुरू झाला प्रवास
बी. पी. सिंह यांचा जन्म डेहराडून येथे झाला. चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यापूर्वी त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) येथे सिनेमॅटोग्राफीचं शिक्षण घेतलं. १९७० ते १९७३ या कालावधीत त्यांनी संस्थेत शिक्षण पूर्ण केलं.
त्यानंतर त्यांनी दूरदर्शनवर कॅमेरामन म्हणून काम करण्यास सुरुवात केली. जवळपास दशकभर कॅमेऱ्यामागे काम करताना त्यांनी दृश्य मांडणी, तांत्रिक बाबी आणि कथाकथनाचा अनुभव मिळवला. पुढे याच अनुभवाचा उपयोग त्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शनात केला.
‘सिर्फ चार दिन’ या गुन्हेगारी रहस्यावर आधारित चित्रपटाच्या कामादरम्यान त्यांची पोलिस तपासपद्धती आणि गुन्हेगारी विश्वाविषयीची उत्सुकता वाढली. याच आवडीने पुढे त्यांच्या रहस्यप्रधान मालिकांच्या निर्मितीला दिशा दिली.






