Telangana Bus Accident। तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील चेवेल्ला मंडल याठिकाणी झालेल्या बस अपघातातील मृतांची संख्या २० वर पोहोचली आहे. या भीषण रस्ते अपघातात टिप्पर चालकाचाही मृत्यू झाला आहे, तर डझनभर प्रवासी जखमी झाले आहेत. हैदराबाद-विजापूर महामार्गावर चेवेल्ला मंडलमधील मिर्झागुडाजवळ तंदूर डेपोहून येणारी आरटीसी बस थेट खडी भरलेल्या टिप्पर ट्रकला धडकली तेव्हा ही दुर्घटना घडली. धडक इतकी भीषण होती की टिप्पर ट्रकमध्ये असणारी खडी बसच्या आत पडली आणि अनेक प्रवासी खाली अडकले. टिप्पर चालकाचा जागीच मृत्यू झाला. समोर आलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी ७० हून अधिक प्रवासी बसमध्ये होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले Telangana Bus Accident। धडक झाल्यानंतर बसमध्ये गोंधळ उडाला होता आणि अनेक प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिक आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आणि जखमींना बाहेर काढण्यात आले. जखमींना चेवेल्ला याठिकाणी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत आणि त्यांनी तपास सुरू केला आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक निर्देश दिले आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य कोणत्याही परिस्थितीत जलदगतीने पूर्ण करावे आणि जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत. अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे निर्देश Telangana Bus Accident। मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक (डीजीपी) यांना अपघातात जखमी झालेल्या सर्व जखमींना तात्काळ हैदराबादमधील रुग्णालयात हलवण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींवर उपचारांची कमतरता भासू नये आणि त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळाव्यात याची खात्री करण्यासही त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व स्तरांवरील अधिकाऱ्यांना परिस्थितीची माहिती देण्याचे आणि अपघाताबाबत सतत अपडेट देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी अपघातस्थळी असलेल्या मंत्र्यांना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्यासाठी तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री रेड्डी यांनी रंगारेड्डी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना बचाव आणि मदत कार्य अधिक जलदगतीने करण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून बाधित लोकांना त्वरित आणि प्रभावी मदत मिळेल.