Tejasvi Surya : ‘काँग्रेसचा इतिहासच महिलाविरोधी’; खासदार तेजस्वी सूर्या यांचा घणाघाती आरोप
Tejasvi Surya : भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांची पुण्यात टीका; काँग्रेस आणि इंडी आघाडीने महिला आरक्षणाविरुद्ध कट रचल्याचा केला आरोप.

Tejasvi Surya – काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या घटकपक्षांनी महिला आरक्षणाची वाट रोखली. संसदीय इतिहासात १९९६ पासून २०२६ पर्यंत एकूण पाच वेळा महिला आरक्षण विधेयक संसदेत आले. प्रत्येक वेळी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी सुनियोजित कट रचून महिला आरक्षणाला विरोध केला, अशी टीका भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी बुधवारी केली.
भाजपने मात्र विरोधात असतानाही महिला आरक्षणाला कायमच पाठिंबा दिला आहे. आता आगामी काळात संसदेत पुन्हा नारी शक्ती वंदन अधिनियम मांडले जाणार असून, त्या वेळी महिलाविरोधी भूमिका घेण्याची हिंमत कोणताही पक्ष करणार नाही, असा दावाही सूर्या यांनी केला. नारी शक्ती वंदन अधिनियम नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर सूर्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Tejasvi Surya )
या वेळी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ, प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक, प्राजक्ता जोशी, प्रणव गंजीवाले, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते. या विधेयकाला विरोध करून महिलांसमवेत महाराष्ट्रातील मतदारांच्या प्रतिनिधित्वाच्या हक्काचाही काँग्रेसने विश्वासघात केला आहे. काँग्रेसचा इतिहासच महिलाविरोधी आहे.
हिंदू महिलांना हक्क देणाऱ्या हिंदू कोड बिलाला तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी विरोध केल्याने राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शहाबानो खटल्यातही काँग्रेसने व्होटबँकेचे तुष्टीकरण करण्यासाठी गरीब मुस्लिम महिलांवर अन्याय केला. तिहेरी तलाकच्या अमानवी आणि बेकायदा प्रथेचे समर्थन केल्याचा आरोपही सूर्या यांनी केला.





