Tejashwi Yadav : राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचयं; तेजस्वी यांनी बिहारच्या जनतेला घातले साकडे

पाटणा : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झोप उडाली आहे. पुढील निवडणुकीनंतर राहुल यांना आपण पंतप्रधान बनवायचं आहे, असे साकडे राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी मंगळवारी बिहारी जनतेला घातले. विरोधी पक्षांनी बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा हाती घेतली आहे. त्यामध्ये राहुल आणि तेजस्वी सहभागी झाले आहेत.
यात्रेच्या तिसऱ्या दिवशी नवादामध्ये सभा झाली. त्यावेळी तेजस्वी बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीत आपण सर्व मिळून एनडीएला बिहारच्या सत्तेवरून हटवू. त्यानंतर पुढील लोकसभा निवडणुकीत आपण राहुल यांना पंतप्रधान बनवू, असे ते म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. नितीश शुद्धीवर असल्याचे वाटत नाही. त्यांना बिहारचा कारभार चालवणे अवघड जात आहे.
जुन्या, दयनीय अवस्थेतील वाहनासारखे त्यांचे सरकार चालत आहे, अशी खिल्ली तेजस्वी यांनी उडवली. बिहारी जनतेला मताधिकारापासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यासाठी भाजप आणि निवडणूक आयोगात हातमिळवणी झाली आहे, या आरोपाचा पुनरूच्चारही त्यांनी केला.





