Tejashwi Yadav : प्रत्येक कुटूंबातील एकाला सरकारी नोकरी देणार; तेजस्वी यादव यांनी जनतेला दिले आश्वासन

पाटणा : बिहारमधील मतदारांना आकर्षित करण्यासाठीची राजकीय रस्सीखेच आता तीव्र बनणार आहे. अशात राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी त्या राज्यातील जनतेला महत्वाची हमी दिली. प्रत्येक बिहारी कुटूंबातील एका सदस्यासाठी सरकारी नोकरीची निश्चिती केली जाईल. त्यासाठी विरोधकांच्या महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यास २० दिवसांत कायदा आणू, असे त्यांनी जाहीर केले.
बिहारमधील बेरोजगारी, उपजीविकेसाठी बिहारींचे इतर राज्यांत होणारे स्थलांतर आदी मुद्दे प्रचारात लावून धरण्याची रणनीती महाआघाडीने आखली आहे. त्याची झलक तेजस्वी यांच्या पत्रकार परिषदेतून दिसली. त्यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी एनडीएवर जोरदार टीकास्त्र सोडले. एनडीए सरकार २० वर्षांच्या राजवटीत तरूणांना नोकऱ्या पुरवू शकले नाही.
त्याउलट, आम्ही बिहारची सत्ता मिळाल्यास २० दिवसांत सरकारी नोकऱ्यांविषयीचा कायदा आणू. नव्या कायद्याची अंमलबजावणी २० महिन्यांत केली जाईल. मी अल्पकाळ सत्तेत असताना ५ लाख रोजगार उपलब्ध करण्यात आले. त्याआधारे सत्तेत पूर्ण ५ वर्षांचा कार्यकाळ मिळाल्यास मला काय करणे शक्य होईल त्याची कल्पना करा, अशी जोरदार शाब्दिक बॅटिंग त्यांनी केली.
तेजस्वी यांनी केवळ सरकारी नोकऱ्यांशी संबंधित कायद्याचे आश्वासन देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार अद्याप जाहीर न होणे, महाआघाडीचे जागावाटप आदी प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दर्शवला. त्यातून त्यांनी संबंधित हमी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचवण्याला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने बिहारमधील राजकीय लगबग आता वाढली आहे. त्या राज्यात निवडणुकीसाठी ६ आणि ११ नोव्हेंबरला दोन टप्प्यांत मतदान होईल.





