Tej Pratap Yadav : हा हिरवा झेंडा असलेला बनावट पक्ष; तेजप्रताप यादव यांची तेजस्वींवर टीका

वैशाली : राजदच्या ढोंगीपणाला बळी पडू नका. हा हिरवा झेंडा असलेला बनावट पक्ष आहे. खरा पक्ष लालू यादव यांचा जनशक्ती जनता दल आहे. तेजस्वी यादव यांच्यासारखे काही लोक जनतेची दिशाभूल करत आहेत, पक्षच आमच्यासाठी सर्वस्व असल्याचे सांगत आहेत, मात्र आमच्यासाठी जनताच सर्वस्व आहे. जनताच पक्ष बनवते आणि जनाताच सरकार चालवते, अशी घाणाघाती टीका जनशक्ती जनता दलाचे (जेडी) अध्यक्ष तेजप्रताप यादव यांनी वैशाली जिल्ह्यातील राघोपूर मतदार संघात झालेल्या रॅलीमध्ये केली.
तेजप्रताप यादव यांचे धाकटे बंधू तेजस्वी यादव हे राघोपूर मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर जनशक्ती जनता दलाने (जेडी) प्रेमकुमार यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये तेजप्रताप यादव यांनी आपल्या ज्येष्ठ बंधूंवर हल्लाबोल केला.
रॅलीनंतर तेजप्रताप यादव यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडीया अकाउंटवर देखील या संदर्भात पोस्ट केली असून आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, मी आज वैशालीतील राघोपूर मतदार संघात आमचे उमेदवार प्रेमकुमार यांच्यासाठी जाहीर सभा केली आहे. या सभेला जनतेची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्यांचे मौल्यवान आशिर्वाद हे सिद्ध करतात की, राघोपूर विधानसभा मतदार संघामध्ये जनशक्ती दलाची एक मजबूत लाट आहे. मला विश्वास आहे की, येथील सर्व नागरिक आम्हाला भरभरुन आशिर्वाद देतील.
मुलभूत सुविधांवर काम करणार
यावेळी तेजप्रताप यादव यांनी जनतेचा आपल्यावर विश्वास असल्याचा देखील दावा केला. त्यांनी आपल्या पोस्टममध्ये महुआ व राघोपूर या दोन विधानसभा मतदार संघांचा उल्लेख करताना आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मला विश्वास आहे की, या दोन मतदार संघातील लोक आम्हावर पूर्णपणे विश्वास ठेवतील. मी वचण देतो की आम्ही सर्व मुलभूत सुविधांसह या ठिकाणांच्या चांगल्या विकासासाठी काम करणार आहोत, असे म्हणाताना, येथील उमेदवारांना मोठ्या फरकाने विजयी करा असे आवाहन देखील केले.




