Tej Pratap Yadav : ‘त्या’ वादग्रस्त पोस्टवर तेजप्रताप यादव यांनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले…

पाटणा : बिहारच्या राजकारणात खळबळ माजवणारे लालू प्रसाद यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांनी अखेर त्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टवर आपले मौन सोडले आहे. त्या पोस्टनंतरच त्यांना राष्ट्रीय जनता दलातून सहा वर्षांसाठी काढून टाकण्यात आले आहे. त्यांनी आता एका मुलाखतीत खुलासा केला आहे. त्यांनी केवळ अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केल्याचे मान्य केले नाही तर ते प्रेमात पडले होते आणि त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही असेही म्हटले आहे.
फोटो मीच पोस्ट केला होता. प्रेमाची किंमत मोजावी लागते, पण त्यात कोणताही गुन्हा नाही. आता हा मुद्दा मागे ठेवू इच्छितो आणि आता त्यांचे पूर्ण लक्ष बिहारच्या राजकारणावर आणि लोकांची सेवा करण्यावर आहे असे त्यांनी नमूद केले. या पोस्टनंतर तेज प्रताप यादव यांना ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आले. तसेच, कुटुंबापासूनही त्यांना दूर राहावे लागले. मुलाखतीत तेजप्रताप यांनी पक्षाच्या या निर्णयावर थेट काहीही म्हटले नाही, परंतु म्हणाले, मी गेलेल्या गोष्टींबद्दल बोलू इच्छित नाही. आता मी भविष्याचा विचार करत आहे.
मला पक्षातून काढून टाकता येईल, पण लोकांच्या हृदयातून मला कोणीही काढून टाकू शकत नाही. निवडणुकीच्या वेळी परिस्थिती काहीही असो, मी पुन्हा पक्षात नक्कीच परत येईन. त्यांनी असेही सांगितले की ते बिहारच्या लोकांसाठी एक यात्रा काढण्याची योजना आखत आहेत, ज्याचे नाव योग्य वेळी ठरवले जाईल.तेज प्रताप यांनी असेही म्हटले की त्यांचे शत्रू सर्वत्र उपस्थित आहेत.
शत्रू प्रत्येक पावलावर असतात, शत्रू घरीही असू शकतात. जनता त्यांच्या शत्रूंना उत्तर देईल. जरी त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, परंतु हे विधान राजकीय आणि कौटुंबिक मतभेदांकडे निर्देश करते. तेज प्रताप यांनी स्पष्ट केले की ते राजकारणापासून दूर नाहीत. जनता माझी भूमिका ठरवेल. मी सतत लोकांमध्ये जात आहे. माझे वडील माझ्यासाठी सर्वोपरि आहेत. मी बिहार निवडणूक नक्कीच लढेन.





