Bihar Assembly Elections 2025: लालू प्रसाद यादवांच्या मोठ्या मुलाचा उमेदवारी अर्ज दाखल

Bihar Assembly Elections 2025: बिहार विधानसभा निवडणूक २०२५ च्या रिंगणात तेज प्रताप यादव यांनी धडाकेबाज पुनरागमन केले आहे. राष्ट्रिय जनता दल (आरजेडी)चे संस्थापक लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि जनशक्ती जनता दलचे प्रमुख तेज प्रताप यांनी गुरुवारी महुआ उपविभागीय कार्यालयात हजारो समर्थकांसह नामांकन अर्ज दाखल केला.
तेज प्रताप यांनी हातात आजीचा फोटो घेऊन नामांकन दाखल केले. २०१५ मध्ये प्रथमच महुआतून आमदार म्हणून निवडणूक जिंकलेले तेज प्रताप हे २०२० मध्ये समस्तिपूरमधील हसनपुरकडे सरकले आणि पुन्हा विजयी झाले. मात्र, कुटुंब आणि पक्षापासून बाजूला झाल्यानंतर आता जनशक्ती जनता दलच्या बॅनरखाली महुआतूनच पुन्हा रिंगणात उतरले आहेत.
नामांकनापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना, “आई-वडिलांसह आजींचे आशीर्वाद मिळाले आहेत. त्या माझ्या सर्वांत प्रिय आहेत. वृंदावनमधील गुरूही माझ्यासोबत आहेत आणि महुआचे लोक मला बोलावत आहेत,” असे सांगितले. “आई-आजींच्या आशीर्वादाने कोणतीही आव्हानं मोठी नाहीत,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.





