Tesla Roadster : टेस्लाचा अविष्कार.! हवेत झेप घेणाऱ्या रोडस्टर कारची पहिली झलक; तीन प्रकारात उपलब्ध होणार
अमेरिकेतील टेक्सास राज्यातील वाको परिसरात आयोजित कार्यक्रमात एलॉन मस्क यांनी या कारची पहिली झलक दाखवली. या कारमध्ये असलेल्या वैशिष्ट्यांमुळे जगभरात तिची जोरदार चर्चा सुरू आहे.

Tesla Roadster – एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने त्यांची बहुचर्चित रोडस्टर ही नवी इलेक्ट्रिक कार जगासमोर सादर केली आहे. अमेरिकेतील टेक्सास राज्यातील वाको परिसरात आयोजित कार्यक्रमात एलॉन मस्क यांनी या कारची पहिली झलक दाखवली. या कारमध्ये असलेल्या वैशिष्ट्यांमुळे जगभरात तिची जोरदार चर्चा सुरू आहे.
टेस्लाने दावा केला की, या आगामी रोडस्टरमध्ये थेट रॉकेट थ्रस्टर्स बसवण्यात आले आहेत. स्पेस-एक्स कंपनीचे हे रॉकेट थ्रस्टर्स असल्यामुळे ही कार हवेतही उडू शकते. आतापर्यंत हवेत उडणाऱ्या कारबाबत केवळ कल्पनाच केली जात होती. मात्र टेस्लाने हे संशोधन प्रत्यक्ष जगासमोर आणले आहे.
बॅटरीवर चालणारी ही कार अवघ्या ०.८१ सेकंदात शून्य ते १०० किलोमीटर प्रतितास वेग गाठू शकते. कामगिरीच्या बाबतीत ही कार इतर कारच्या तुलनेत वेगळ्याच स्तरावर पोहोचेल अशी शक्यता आहे.
परफॉर्मन्स, थ्रस्ट आणि रॉकेट या तीन आवृत्त्यांमध्ये ही कार उपलब्ध होण्याची माहिती आहे. २०२८ पासून या नव्या कारचे उत्पादन सुरू होईल, असे मस्क यांनी सांगितले.
या कारद्वारे टेस्लाने केवळ वेगाच्या पलीकडे जाऊन उड्डाण आणि मनोरंजनाच्या एका अनोख्या स्वरूपापर्यंत पोहोचण्याची क्षमता सिद्ध केली आहे. 2028 मध्ये जेव्हा या वाहनाची डिलिव्हरी सुरू होईल, तेव्हा ही कार इलेक्ट्रिक वाहनांच्या इतिहासात एक नवीन अध्याय ठरेल.
रोडस्टार तीन प्रकारात उपलब्ध
टेस्ला रोडस्टर तीन प्रकारांत उपलब्ध असणार आहे. पहिला प्रकार परफॉर्मन्स आहे, जो रस्त्यावरील वापरासाठी डिझाइन केला असून, यात दोन सीट्स, ॲक्टिव्ह एरोडायनॅमिक्स आणि मल्टी-मोड सक्शन सिस्टम आहे.
दुसरा प्रकार थ्रस्ट आहे, जो रेस ट्रॅकसाठी बनवला असून, त्याच्या मागील भागात कोल्ड-गॅस थ्रस्टर्स बसवलेले आहेत. तिसरा प्रकार रॉकेटआहे, जो उड्डाणासाठी डिझाइन केला आहे. यात एका व्यक्तीची बसण्याची सोय असून दहा कोल्ड-गॅस थ्रस्टर्स दिले आहेत.





