Womens Asia Cup : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधीच टीम इंडिया सेमीफायनलमध्ये! उपांत्य फेरीत ‘या’ संघाशी भिडणार
Womens Asia Cup : भारतीय संघाने सुरुवातीचे सलग दोन सामने एकतर्फी जिंकत थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

India Enter Womens Asia Cup 2026 Semifinal Potential Opponent Pakistan Clash : संयुक्त अरब अमिरातीमध्ये रंगलेल्या महिला आशिया चषक २०२६ (Women’s Asia Cup 2026) स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. सुरुवातीचे सलग दोन सामने एकतर्फी जिंकत भारतीय महिला संघाने थेट उपांत्य फेरीत (Semifinal) प्रवेश मिळवला आहे. विशेष म्हणजे, साखळी फेरीतील पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धचा महामुकाबला खेळण्यापूर्वीच भारताने उपांत्य फेरीचे तिकीट पक्के केले आहे.
थायलंड आणि हाँगकाँगचा धुव्वा; ५.७७५ नेट रनरेटसह भारत अव्वल!
भारताने पहिल्या साखळी सामन्यात थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत मात केली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात स्मृती मानधनाच्या वादळी शतकाच्या जोरावर भारताने हाँगकाँगचा १३७ धावांच्या महाकाय फरकाने पराभव केला. या सलग दोन मोठ्या विजयांमुळे भारताचा नेट रनरेट ५.७७५ वर पोहोचला असून टीम इंडिया ग्रुप-ए मध्ये गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान आहे. भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार असून त्यातही भारताचे पारडे जड मानले जात आहे.
उपांत्य फेरीत भारताचा सामना कोणाविरुद्ध? अशी रंगणार चुरस –
Massive win for Team India! Smriti Mandhana’s record-breaking century stole the spotlight in the first half, before a collective bowling effort sealed back-to-back victories for the Women in Blue and gave their NRR another boost 🇮🇳💙#DPWorldWomensAsiaCup2026 #INDWvHKW #ACC pic.twitter.com/48j2HdKJxi
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 3, 2026
साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात पाकिस्तानला नमवून भारत ग्रुप-ए मध्ये अव्वल स्थानी राहिल्यास उपांत्य फेरीत भारताची गाठ ग्रुप-बी मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी पडेल. सध्या ग्रुप-बी मध्ये श्रीलंकेचा संघ सलग दोन विजयांसह अग्रस्थानी आहे. श्रीलंकेचा शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. जर श्रीलंकेने बांगलादेशचा पराभव केला, तर उपांत्य फेरीत भारताचा मुकाबला बांगलादेशशी होईल. मात्र, बांगलादेशकडून श्रीलंका पराभूत होऊन दुसऱ्या स्थानी घसरल्यास उपांत्य फेरीत भारत विरुद्ध श्रीलंका असा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळेल.
१० आणि ११ सप्टेंबरला उपांत्य फेरीचा थरार; १३ सप्टेंबरला महाअंतिम सामना!
८ संघांचा सहभाग असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत बाद फेरीचे समीकरण आता रंगतदार वळणावर आले आहे. महिला आशिया चषक २०२६ चे उपांत्य फेरीचे सामने १० आणि ११ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जातील. तर विजेतेपदासाठीचा महाअंतिम सामना १३ सप्टेंबर रोजी रंगणार आहे. हरमनप्रीत ब्रिगेडचा सध्याचा फॉर्म पाहता भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.





