Team India : बीसीसीआयचा टीम इंडियावर बक्षीसांचा वर्षाव! ‘या’ तीन विजयानंतर मिळाले तब्बल २०४ कोटी रुपये

Team India prize money awarded by BCCI : भारतीय संघाने गेल्या 15 महिन्यांत आपल्या अप्रतिम कामगिरीने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. सलग तीन मल्टी-टीम टूर्नामेंट जिंकत भारतीय संघाने आपल्या चाहत्यांची मनं जिंकली असून आपली ताकदही सिद्ध केली आहे. यामध्ये 2024 टी20 विश्वचषक, 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2025 आशिया कप यांचा समावेश आहे. या सर्व स्पर्धांमध्ये भारतीय संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवले असून बीसीसीआयने खेळाडूंवर कोट्यवधींच्या बक्षिसांची बरसात केली आहे.
आशिया चषक 2025 मध्ये भारताची बाजी –
आशिया चषक 2025 मधील विजय हा भारतीय संघासाठी विशेष ठरला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यांनंतर आणि 7 मे रोजीच्या ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे क्रिकेट संघ आमनेसामने आले होते. या सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भारताने या स्पर्धेत पाकिस्तानला तब्बल तीन वेळा पराभूत केले. या शानदार विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी बीसीसीआयने मोठी घोषणा करत संघासाठी 21 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली.
3 blows.
0 response.
Asia Cup Champions.
Message delivered. 🇮🇳21 crores prize money for the team and support staff. #AsiaCup2025 #INDvPAK #TeamIndia pic.twitter.com/y4LzMv15ZC
— BCCI (@BCCI) September 28, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये ऐतिहासिक विजय –
यापूर्वी, 9 मार्च 2025 रोजी भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. भारताने तिसऱ्यांदा या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या स्पर्धेतही भारतीय संघाने एकही सामना न गमावता जेतेपद पटकावले. या यशानंतर बीसीसीआयने 20 मार्च रोजी खेळाडू, प्रशिक्षक आणि संघाशी संबंधित सर्व सदस्यांसाठी 58 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली.
टी-20 विश्वचषकात 125 कोटींची कमाई –
या दोन्ही स्पर्धांपूर्वी, जून 2024 मध्ये भारतीय संघाने टी-20 विश्वचषकावर नाव कोरले. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत 17 वर्षांनंतर ही ट्रॉफी जिंकली. यानिमित्त बीसीसीआयने संघासाठी 125 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली, जी आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षिस रक्कम आहे.
हेही वाचा – IND vs PAK : सूर्याचा मोठा निर्णय! सशस्त्र दल आणि पहलगाममधील पीडित कुटुंबांना देणार तब्बल ‘इतके’ कोटी
तीन जेतेपदानंतर टीम इंडियावर 204 कोटींची बरसात –
या तीनही स्पर्धांमधील विजयांसाठी बीसीसीआयने भारतीय संघावर एकूण 204 कोटी रुपयांच्या बक्षिसांची पाऊस पाडला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या या अभूतपूर्व यशाने देशाचे नाव उंचावले असून क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.





