Team India : अखेर ठरलं ! टीम इंडिया सेमी फायनलमध्ये ‘या’ संघाशी भिडणार

Team India : आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या सेमी फायनलसाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि भारत हे चार संघ पात्र ठरले आहेत. शनिवारी झालेल्या साखळी फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने पराभव केला. ज्यामुळे सेमी फायनलचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. यानंतर भारताचा सेमी फायनलमधील प्रतिस्पर्धी आणि सामन्याची तारीख निश्चित झाली आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिका प्रथम फलंदाजी करताना 97 धावांत सर्वबाद झाली. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य सहज गाठत 7 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलिया 13 गुण आणि +2.102 च्या नेट रनरेटसह पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. दुसरीकडे, पराभूत झालेल्या दक्षिण आफ्रिकेचे 10 गुण आणि -0.420 नेट रनरेटसह दुसरे स्थान आहे.
उद्या, रविवारी (26 ऑक्टोबर 2025), साखळी फेरीतील शेवटचे सामने खेळवले जाणार आहेत. इंग्लंड न्यूझीलंडविरुद्ध आणि भारत बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. इंग्लंड न्यूझीलंडविरुद्ध जिंकल्यास त्यांचे 11 गुण होतील, तर भारताने बांगलादेशविरुद्ध विजय मिळवल्यास त्यांचे 8 गुण होतील. मात्र, या सामन्यांचा संघांच्या क्रमवारीवर परिणाम होणार नाही, त्यामुळे सेमी फायनलचे सामने निश्चित झाले आहेत.
सेमी फायनलचे वेळापत्रक
पहिला सेमी फायनल सामना पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानी असलेला ऑस्ट्रेलिया आणि चौथ्या स्थानी असलेला भारत यांच्यात गुरुवारी, 30 ऑक्टोबर 2025 रोजी नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर होईल.
दुसरा सेमी फायनल सामना दुसऱ्या स्थानी असलेला दक्षिण आफ्रिका आणि तिसऱ्या स्थानी असलेला इंग्लंड यांच्यात बुधवारी, 29 ऑक्टोबर 2025 रोजी गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडियमवर पार पडणार आहे.
या दोन्ही सेमी फायनलमधील विजयी संघ अंतिम सामन्यात 2 नोव्हेंबर 2025 रोजी आमनेसामने येतील. कोणते दोन संघ फायनलमध्ये पोहोचतील, हे सेमी फायनलनंतर स्पष्ट होईल.





