शिक्षक दिन विशेष : आदर्श शिक्षकाची यशस्वी वाटचाल; प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख

विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन शिक्षकी पेशा स्वीकारणारे व आपल्या रचनात्मक कार्याने आपले अद्वितीय स्थान निर्माण करणारे शिक्षक आदर्शवत आहेत. अशा आदर्शवत शिक्षकांमध्ये प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख यांचे स्थान अग्रभागी आहे. भोर-पुणे येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख यांची शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घकाळ कार्यरत असलेली, यशस्वी वाटचाल बहुमूल्य स्वरूपाची आहे. महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेचे उपाध्यक्ष व महाराष्ट्रातील ख्यातनाम विद्यापीठांमध्ये सिनेट, ऍकॅडमिक कौन्सिल, बोर्ड ऑफ स्टडीज मेंबर म्हणून त्यांची भूमिका प्रभावी ठरली आहे. आज शिक्षकदिनाच्या निमित्ताने आदर्श शिक्षक प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा संक्षिप्त मागोवा…

शिक्षक हा जसा विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक असतो, तसाच तो समाज व राष्ट्रबांधणीमध्ये अग्रेसर असणारा उत्कृष्ट अभियंता असतो. राष्ट्राच्या सर्वांगीण विकासातील या शिल्पकाराचे योगदान नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. देशाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या मनुष्यबळाची जडणघडण करण्यात शिक्षकाची भूमिका कायमच महत्त्वपूर्ण राहिली आहे. त्यामुळेच चांगले उपक्रमशील व प्रभावी शिक्षक ही राष्ट्राची मौलिक संपत्ती मानली जाते.
दर्जेदार प्रभावशाली अध्यापन
शिक्षकाची खरी ओळख त्याचे अध्यापन असते. देशमुख सरांनी गेली 38 वर्षे अध्यापनाचे कार्य अविरतपणे केले. आपण शिकवत असलेल्या विषयांचे सखोल ज्ञान, विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे उत्कृष्ट कौशल्य त्यांच्याकडे आहे. एक विद्वान, व्यासंगी, प्रयोगशील व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक या दृष्टीने प्राचार्य देशमुख सरांचा लौकिक आहे. फक्त वाणिज्य विषयच नव्हे तर इतर अभ्यास विषयांचेही चौफेर ज्ञान त्यावर सरांचे प्रभुत्त्व राहिले आहे. कोणतेही विषय सहज सुलभतने मांडण्याची रचनात्मक वक्तृत्वशैली हे सरांचे सामर्थ्य आहे.
प्रभावी जिज्ञासू संशोधक मार्गदर्शक
कोणत्याही विषयांचे सखोल ज्ञान मिळविण्याची संशोधकीय, जिज्ञासा हे सरांचे खास वैशिष्ट्य आहे एम.कॉम, पीएचडीबरोबरच सरांनी एमएमएस, जीडीसी ऍण्ड एएमए एज्युकेशन, एमए अर्थशास्त्र, बॅचरल ऑफ जर्नालिझम, एम.एम.एस. इत्यादी पदव्या प्राप्त करून त्यांनी आपल्या चौफेर अभ्यासुवृत्तीचा परिचय दिला आहे. संशोधकीय क्षेत्रातील प्राचार्य देशमुख सरांचे कार्य उत्तुंग स्वरूपाचे आहे. बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये पीएचडी प्राप्त करून सरांनी आत्तापर्यंत देशविदेशातील विद्यार्थ्यांना एमफील व पीएचडी पदवीसाठी मौलीक मार्गदर्शन केले आहे व करत आहेत. सरांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत 42 विद्यार्थ्यांनी पीएचडी तर 24 विद्यार्थ्यांनी एमफील पदवी संपादन केली आहे. आपल्या अभ्यासू व दीर्घ अनुभवाचा यथोचित उपयोग करून सरांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयदृष्ट्या उपयुक्त ठरणारे अनेक संशोधन प्रकल्प साकारले आहेत. राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवरील अनेक परिषदांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. या परिषदांमध्ये त्यांनी अतिशय अभ्यासपूर्व शोधनिबंध सादर केले आहेत. अनेक मान्यताप्राप्त नॅशनल- इंटरनॅशनल रिसर्च जरनल्समध्ये ते प्रकाशित झाले. आत्तापर्यंत सरांनी 9 आंतरराष्ट्रीय व 38 राष्ट्रीय परिषदांमध्ये व्याख्याने दिली आहेत. विविध नामवंत संस्थामध्ये व्हिजीटींग प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.
ग्रंथ प्रकाशन
देश-विदेशातील विद्यापीठांना उपयुक्त ठरतील अशा 38 अभ्यासपूर्ण ग्रंथांचे लेखन सरांनी केले आहे. तसेच प्रमुख संपादक म्हणून त्यांनी 10 ग्रंथाचे संपादन केले आहे. 6 रिसर्च जरनल्सचे संपादनही केले आहे.
उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्य
ज्ञान, विज्ञान, सुसंस्कार याबरोबरच उत्कृष्ट प्रशासन हे प्राचार्य देशमुख सरांचे खास वैशिष्ट्य आहे. गेल्या 27 वर्षापासून ते अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा अत्यंत समर्थपणे संभाळत आहेत. सर्वांना बरोबर घेवून प्रत्येकाच्या क्षमतेनुसार त्यांच्याकडून दर्जेदार काम करून घेणे, सर्व घटकांशी सलोख्याचे सामोपचाराचे व विश्वासाचे संबंध ठेवून महाविद्यालयीन कामकाज प्रभावी करण्याचे त्यांचे कौशल्य महत्त्वपूर्ण आहे.
पुणे विद्यापीठाबरोबरच नांदेड, नाशिक, दिल्ली अशा विविध विद्यापीठातील अभ्यासमंडळात त्यांनी आपल्या प्रशासकीय नेतृत्वाने चैतन्य निर्माण केल असून महाविद्यालय व विद्यापीठ पातळीवरील सर्व घटकांना बरोबर घेऊन सकारात्मक दृष्टीने काम करण्याचे प्रशासकीय कसब सरांच्या अंगी आहे. सर जसे उत्कृष्ट प्राध्यापक आहेत तसेच ते उत्कृष्ट प्रशासकही आहेत.
विदेशी शैक्षणिक भेटी
शिक्षणाचे जागतिकीकरण लक्षात घेवून सरांनी विविध परदेशी विद्यापीठांशी ज्ञानाच्या माध्यमातून आपले व्यापक संबंध प्रस्थापित केले आहेत. इंटरनॅशनल को-ऑपरेटीव्ह अलाईन्स जिनेव्हा स्वीत्झर्लंड, इंटरनॅशनल को-ऑपरेटीव्ह ट्रेनिंग सेंटर, को-ऑपरेटीव्ह कॉलेज लॉगबग, को-ऑपरेटीव्ह युनियन लि. मॅंचेंस्टर, युके शांघाय चीन, कोटा राजस्थान, थोम्बुराई युनिव्हर्सिटी, बॅंकॉक, थायलंड तसेच इंग्लंड, फ्रान्स मॉरिशस, जर्मनी इत्यादी देशात सरांनी अभ्यास दौरे करून आपल्या विद्वत्तापूर्ण कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. ज्ञानाचे जागतिक दृष्टिकोनातून आदान-प्रदान या उद्देशाने त्यांचे अभ्यास दौरे महत्त्वाचे आहेत.
नावीन्यपूर्ण ज्ञानविस्तार तंत्र
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यापक विकास यावर त्यांचा भर आहे. नित्यनेमाने बदलणाऱ्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करून सरांनी शिक्षणाकडे नेहमीच नव्या दृष्टीने पाहिले त्यासाठी नवीन शैक्षणिक साधन निर्मिती करणे, शिक्षणात नव्या तंत्रांचा अवलंब करणे, केवळ पुस्तकी शिक्षण न देता कौशल्यावर आधारित प्रत्यक्ष अनुभव देणारे शिक्षण विकसित करणे, भविष्यासाठी आवश्यक असणारे कुशल व दर्जेदार विद्यार्थी घडविणे, शिक्षणातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणे, राष्ट्रीय स्वरूपाचे सर्वसंपन्न व्यक्तिमत्त्व विकसित होणारे व्यापक वास्तववादी शिक्षण विद्यार्थ्यांनी कसे मिळेल या दृष्टिकोनातून त्यांनी रचनात्मक प्रयत्न केले आहेत. नवी दृष्टी असणारा एक प्रयोगशील शिक्षक म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रांत आपला प्रभाव निर्माण केला आहे. शिक्षण हे शेवटच्या घटकांपर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोहोचवले पाहिजे. ग्रामीण विद्यार्थी दर्जेदार उच्च प्रतीच्या शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे, यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत.
संस्थात्मक सहकार्य
महाराष्ट्रातील पुणे, नांदेड, नाशिक अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई या विद्यापीठांशी त्यांनी आपले सहसंबंध प्रस्थापित केले आहेत. भारतातील इतर राज्यातील विद्यापीठांशीही त्यांची ज्ञानविषयक देवाण-घेवाण निरंतर सुरुच आहे. परदेशी विद्यापीठांतील नामवंत संस्थांशी त्यांचे परस्पर सहकार्य आहे. फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदींच्या माध्यमातून त्यांनी समाज विकासात योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांना नोकरीविषयक संधी त्वरित उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी विविध कंपन्यांशीही सतत सपंर्क ठेवला आहे. देशविदेशातील संस्थांच्या परस्पर सहकार्यातून व्यापक विद्यार्थी विकास करावा, या दृष्टीने प्राचार्य देशमुख सर सतत कार्यतत्पर राहिले आहेत.
मार्गदर्शकांबद्दलची कृतज्ञता
प्राचार्य देशमुख सरांनी सातत्याने शिक्षणाचा व्यापक स्तरावर विस्तार केला असला तरी “डाऊन टू अर्थ’ हा त्यांचा विशेष गुणधर्म राहिला आहे. आपल्या उज्ज्वल वाटचालीत ज्यांनी मौलिक सहकार्य केले, त्यांच्याबद्दल सरांच्या मनात कृतज्ञतेची जाणीव सतत दिसते. आई-वडिलांचे मौलिक संस्कार, सौभाग्यवती व बंधू-भगिनींचे सहकार्य, लोकनेते अनंतरावजी थोपटेसाहेब, स्व. निर्मलाताई थोपटे, आ. संग्रामदादा थोपटे, डॉ. सौ. भाग्यश्रीताई पाटील, उद्योगपती स्व. रसिकलालजी धारिवाल, प्रकाशजी धारिवाल त्यांच्याबद्दल त्यांना प्रचंड आदरभाव आहे. डॉ. एस. व्ही. कडवेकर, प्रा. ए. पी. कुलकर्णी, प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे, डॉ. शिरीष लिमये, डॉ. बाळकृष्ण पुराणिक प्रा. गणेश मेहंदळे, डॉ. रोहिदास जाधव व प्रा. अरुण जोशी यांच्याबद्दल सरांना नेहमीच कृतज्ञता वाटते. शिक्षण क्षेत्रांतील या देदीप्यमान कार्याला असेच सातत्याने सक्षमपणे पुढे नेण्याचा त्यांचा असाच निरंतर प्रयत्न आणि प्रवास राहणार आहे. शिक्षण व सामाजिक उपक्रमातही मौलीक सहभाग देण्यावर त्यांचा भर आहे. अशा सर्वगुणसंपन्न कर्तृत्वशाली प्रयोगशील प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
ग्रामीण व डोंगरी भागांच्या शिक्षण विस्तारात मोलाचा सहभाग
सन्माननीय माजी मंत्री अनंतरावजी थोपटेसाहेब यांच्या दूरदृष्टीतून व्यापक समाजहिताच्या विचाराने भोरच्या डोंगरी दुर्गम भागांत राजगड ज्ञानपीठ ही संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या माध्यमातून प्राचार्य देशमुख सरांनी शिक्षण विस्ताराचा सातत्याने प्रयत्न केला आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शिक्षण उपलब्ध व्हावे, यादृष्टीने कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक कृषी तसेच व्यवस्थापन अशा विविध विभागांना समृद्ध करण्यावर त्यांनी भर दिला आहे. अकरावीपासून पीएचडी पर्यंतच्या शिक्षण सुविधा निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला आहे. साधारण पाच हजारांवर विद्यार्थी संख्या असणाऱ्या या महाविद्यालयाचा शैक्षणिक आलेख सातत्याने उंचावत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी उत्कृष्ट एनसीसी, एनएसएस, विद्यार्थी विकास मंडळ, स्पर्धा परीक्षांकडे, सुसज्ज व समृद्ध ग्रंथालय, रिसर्च सेंटर, व्हर्च्युअल क्लासरुम, आदींच्या माध्यमातून सक्षम शिक्षण व्यवस्था करण्यावर त्यांचा भर राहिलेला आहे. त्यामुळे महाविद्यालयाला नॅकची “अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे.
मानाचे पुरस्कार
प्राचार्य देशमुख सर यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या प्रभावशाली कार्यामुळे अनेक संस्थांनी त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे.
1. मॉरिशस सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल ग्लोरी ऍवॉर्ड
2. महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार
3. पुणे विद्यापीठाचा शिक्षक गौरव पुरस्कार
4. पुणे विद्यापीठाचा “बेस्ट प्रिंन्सीपल’ ऍवॉर्ड
5. पुणे विद्यापीठाचा प्रा. जी. बी. कुलकर्णी वाणिज्य शिक्षक पुरस्कार
6. भोर पंचायत समितीचा आदर्श शिक्षकाचा अनंत पुरस्कार
7. महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेचा डॉ. पी. सी. शेजवलकर आदर्श वाणिज्य शिक्षक पुरस्कार
8. सी. टी. बोरा कॉलेज, शिरूर; राजगड ज्ञानपीठ, भोर आदी विविध संस्थांचे मानपत्र








