Teachers’ and Graduates’ Constituencies: शिक्षक, पदवीधर मतदारसंघांची मतमोजणी सुरू
Teachers' and Graduates' Constituencies:
विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा निश्चित करण्यास विलंब
Teachers’ and Graduates’ Constituencies: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतमोजणीला मंगळवारी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. उमेदवारांची मोठी संख्या आणि मतदानाचा वाढलेला टक्का यामुळे रात्री उशिरापर्यंत वैध- अवैध मतांची विभागणी आणि पसंतीक्रमानुसार मतांचे गठ्ठे बांधण्याचे काम सुरू होते. त्यामुळे विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा निश्चित करण्यास विलंब झाल्याने निकाल येण्यास बुधवारचा दिवस उजाडणार आहे.
पुणे विभागात सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या पाचही जिल्ह्यांतून पदवीधर मतदारसंघासाठी २ लाख ४३ हजार ६११ मतदान झाले आहे. शिक्षक मतदार संघात ५३ हजार १८५ मतदान झाले.
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी ४७ उमेदवार रिंगणात होते. शिक्षक मतदारसंघात ३० उमेदवार रिंगणात होते. सकाळी आठ वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली.
दुपारी तीन वाजेपर्यंत पाच जिल्हयातील मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. त्यानंतर वैध आणि अवैध मतपत्रिकांच्या विभागणीचे काम सुरु करण्यात आले. सायंकाळी साडेसहा वाजणच्या सुमारास शिक्षक मतदारसंघातील वैध- अवैध मतांची मोजणी पूर्ण झाली.
या मतदारसंघात एकूण ५१ हजार ५११ मते वैध ठरली, तर १ हजार ६७३ मते अवैध ठरली. त्यांनतर विजयासाठी २५ हजार ७५६ चा कोटा निश्चित करण्यात आला. त्यानंतर पसंतीक्रमांच्या मतांची गठ्ठे करण्याचे काम सुरू झाले.
पदवीधर मतदारसंघाची रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वैध-अवैध मतांची मोजणी पूर्ण झाली. सुमारे २ लाख २६ हजार मते वैध ठरली आहेत. त्यानंतर सुमारे १ लाख १३ हजारांचा कोटा निश्चित करण्यात आला. त्यानंतर पसंतीक्रमानुसार मतांच्या गठ्ठे करण्याचे काम सुरू करण्यात आले.
निकालाची पद्धत Teachers’ and Graduates’ Constituencies:
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी निश्चित केलेल्या मतांचा कोटा एखाद्या उमेदवाराने पूर्ण केला, तर तो विजयी घोषित केला जातो. जर हा कोटा पूर्ण झाला नाही, तर जो शेवटच्या क्रमांकाचा जो उमेदवार आहे. त्या उमेदवाराची दोन नंबरची मते कोणाला मिळाली, ती मते त्याच्या पारड्यात टाकली जातात. त्यातूनही विजयासाठीचा कोटा पूर्ण झाला नाही, तर पुन्हा शेवटून दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारीची दोन नंबरची मते विचारात घेतली जातात. अशा प्रकारे उमेदवारांची दुसऱ्या क्रमांच्या मतांची मोजणी करून एखाद्या उमेदवाराने आवश्यक मतांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर उमेदवार विजयी घोषित केला जातो.





