Teacher Recruitment : महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रियेत मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर

Teacher Recruitment : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत शालेय शिक्षण विभागाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीची संपूर्ण जबाबदारी आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्यात आली आहे. शिक्षक भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे आयोजन आणि त्यानंतरची निवड प्रक्रिया या दोन्ही गोष्टी एकाच संस्थेच्या नियंत्रणाखाली राहाव्यात, या मुख्य उद्देशाने शासनाने हा मोठा निर्णय घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे.
राज्यात २०१७ पासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया शिक्षण आयुक्तालयामार्फत राबवली जात होती. मात्र, शिक्षण आयुक्त कार्यालय हे शालेय शिक्षण विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावरील प्रमुख प्रशासकीय कार्यालय आहे. शासनाच्या विविध शैक्षणिक धोरणांची आणि निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करणे, त्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे ही या कार्यालयाची मूळ जबाबदारी आहे. शिक्षक पदभरती ही एक निरंतर चालणारी आणि अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया आहे.
यामध्ये उमेदवारांच्या अभियोग्यता चाचणीनंतर त्यांचे स्व-प्रमाणीकरण करणे, विविध शाळांच्या जाहिराती स्वीकारणे, विषयानुसार आणि प्रवर्गानुसार समांतर आरक्षणाची पडताळणी करणे, पात्रता गुण (कटऑफ) निश्चित करणे आणि उमेदवारांची शिफारस करणे अशी गुंतागुंतीची कामे करावी लागतात. या तांत्रिक कामांमुळे शिक्षण आयुक्त कार्यालयाचा बराचसा वेळ खर्ची पडत होता, ज्याचा विपरीत परिणाम इतर महत्त्वाच्या शैक्षणिक निर्णयांच्या अंमलबजावणीवर होत असल्याचे दिसून आले.
या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही एक स्वायत्त संस्था असल्याने आणि त्यांच्यामार्फत आधीच शिक्षक पात्रता परीक्षा (TET) व शिक्षक अभियोग्यता चाचणी (TAIT) घेतल्या जात असल्याने, भरतीचे कामकाज त्यांच्याकडे सोपवणे अधिक सोयीचे ठरणार आहे.
परीक्षा परिषदेला यापूर्वीही अशा भरती प्रक्रियेचा अनुभव असल्याने परीक्षा आयोजन आणि निवड प्रक्रिया एकाच छताखाली येणे शक्य होणार आहे. या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका ‘सुकाणू समिती’ची स्थापना करण्यात आली असून, यामध्ये विविध विभागांच्या संचालकांचा समावेश असेल. आगामी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२५ पासून शिक्षक भरतीचे सर्व कामकाज परीक्षा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.




