Mumbai Auto-Taxi : मुंबईत १ सप्टेंबरपासून टॅक्सी प्रवास महाग होणार.! तब्बल इतक्या रुपयांची भाडेवाढ होणार
भाडेदरात सुधारणा केल्यामुळे १ सप्टेंबरपासून मुंबईतील नागरिकांसाठी सीएनजीवर चालणाऱ्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि रिक्षांचा प्रवास महाग होणार आहे.

Mumbai Auto-Taxi – परिवहन प्राधिकरणाने भाडेदरात सुधारणा केल्यामुळे १ सप्टेंबरपासून मुंबईतील नागरिकांसाठी सीएनजीवर चालणाऱ्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि रिक्षांचा प्रवास महाग होणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने महानगर क्षेत्रात धावणाऱ्या काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या भाड्यात २ रुपये आणि रिक्षांच्या भाड्यात १ रुपया वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.
या सुधारणेनंतर, टॅक्सीमधील पहिल्या १.५ किमी अंतरासाठी प्रवाशांना सध्याच्या ३१ रुपयांऐवजी ३३ रुपये मोजावे लागतील, तर रिक्षाचे किमान भाडे २६ रुपयांवरून २७ रुपये होईल.
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने झालेल्या बैठकीत या भाडेवाढीला मंजुरी दिली. महाराष्ट्रातील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि रिक्षांच्या भाडेदरात सुधारणा करण्यासाठी चार सदस्यांच्या खटुआ समितीने तयार केलेल्या सूत्रानुसार हा निर्णय घेण्यात आला.
टॅक्सी आणि रिक्षा चालकांना सुधारित भाडे आकारण्याची परवानगी केवळ त्यांच्या वाहनांमधील इलेक्ट्रॉनिक मीटरचे कॅलिब्रेशन केल्यानंतरच दिली जाईल. प्राधिकरणाने टॅक्सी आणि ऑटो-रिक्षा चालकांना त्यांचे मीटर पुन्हा प्रमाणित (रिकॅलिब्रेट) करून घेण्यासाठी १ सप्टेंबरपासून नोव्हेंबरच्या अखेरपर्यंतची मुदत दिली आहे.
असे न करणाऱ्यांना दंडाला सामोरे जावे लागेल, सांगितले आहे. प्राधिकरणाने १८ महिन्यांच्या कालावधीनंतर मुंबईतील टॅक्सी आणि ऑटो-रिक्षांच्या दरांमध्ये सुधारणा केली आहे. एमएमआर क्षेत्रात टॅक्सी आणि ऑटो-रिक्षांच्या दरात प्रत्येकी ३ रुपयांची शेवटची वाढ १ फेब्रुवारी २०२५ रोजी लागू झाली होती.






