टाटा ओपन टेनिस | रामकुमार रामनाथनला वाईल्ड कार्ड

पुणे – चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा अव्वल मानांकित टेनिसपटू रामकुमार रामनाथन याला वाईल्ड कार्ड प्रदान करण्यात आले असून त्याला एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश मिळणार आहे. चौथ्या पर्वातील ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथे 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे.
गतवर्षी नोव्हेंबरमध्ये बहरेन, मानामा येथील एटीपी स्पर्धेत रामकुमार याने विजेतेपद पटकावले होते आणि अव्वल 200 खेळाडूंच्या यादीत आपले स्थान निश्चित केले होते. 2017 साली जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या डोमिनिक थीमचा सरळ सेटमध्ये पराभव केला होता.
टाटा ग्रुप प्रायोजित व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) च्या वतीने आयोजित दक्षिण आशियातील एकमेव250 स्पर्धा असलेल्या या स्पर्धेत सलग चौथ्या वर्षी रामकुमार सहभागी होत आहे, अशी माहिती स्पर्धा संचालक प्रशांत सुतार यांनी दिली.
चेन्नईचा रामकुमार हा या वाईल्ड कार्डद्वारे मुख्य ड्रॉमध्ये खेळणार असून युकी भांब्रिचा देखील समावेश त्यात आहे. एकेरी गटाबरोबरच रामकुमार दुहेरीत रोहन बोपन्नाच्या साथीत मुख्य ड्रॉ मध्ये खेळणार आहे, असे एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले आहे.





