टाटा ओपन टेनिस | कॅमिल माझरेख उपांत्य फेरीत

पुणे – चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पोलंडच्या कॅमिल माझरेख याने दुसऱ्या मानांकित इटलीच्या लॉरेन्झो मुस्तेट्टीचा तीन सेटमध्ये सनसनाटी पराभव करत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पोलंडच्या कॅमिल माझरेखने इटलीच्या लॉरेन्झो मुसेट्टीचा टायब्रेकमध्ये 6-2 6-7(5), 6-4 असा पराभव केला.
उपांत्य फेरीत माझरेखचा सामना फिनलॅंडच्या एमिल रुसुवोरी याच्याशी शनिवारी होणार आहे. याआधी उपांत्यपूर्व फेरीत रुसूवोरीने गतविजेत्या जेरी व्हेसलीचा 6-3, 6-4 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
22 वर्षीय रुसुवोरीने सलामीच्या लढतीत गतमालिकेतील उपविजेत्या एगोर गेरासिमोव्हचा पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली. उपांत्यपूर्व फेरीत रुसुवोरीने जेरी व्हेसलीचे आव्हान 1 तास 17 मिनिटांत मोडीत काढले. हि प्रतिष्ठेची स्पर्धा आयएमजी यांच्या मालकी ची असून राईज वर्ल्डवाईड इन इंडिया यांनी संचालित केली आहे.
एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दोन लढती शिल्लक असून त्यानंतर दुहेरीत उपांत्य फेरीत एन श्रीराम बालाजी व विष्णू वर्धन या भारतीय जोडीपुढे लूक सॅव्हील व जॉन पॅट्रेक स्मिथ या अव्वल मानांकित ऑस्ट्रेलियन जोडीचे आव्हान असणार आहे. तर, रोहन बोपन्ना व रामकुमार रामनाथन या भारतीय जोडीने याआधीच उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.





