Tata Group Shares : टाटा समूहाचं काही तासात 45,000 कोटींचं नुकसान; नेमकं कारण काय? अध्यक्ष एन. चंद्रशेखरन…..
Tata Group Shares : एन. चंद्रशेखरन यांनी 20 फेब्रुवारी 2027 नंतर टाटा सन्सच्या अध्यक्षपदासाठी पुनर्नियुक्ती न मागण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर टाटा समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

Tata Group Shares : टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी 20 फेब्रुवारी 2027 रोजी आपला सध्याचा कार्यकाळ संपल्यावर पुनर्नियुक्तीसाठी अर्ज करणार नसल्याचे सांगितल्यानंतर, बुधवारी टाटा समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाली. टीसीएसच्या शेअर्समध्ये जवळपास 4 टक्क्यांची घसरण झाली.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे शेअर्स 3.71 टक्क्यांनी, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे 2.44 टक्क्यांनी, टाटा एलक्सीचे 2.23 टक्क्यांनी, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे 1.92 टक्क्यांनी आणि टाटा स्टीलचे 1.57 टक्क्यांनी घसरले. रॅलिस इंडियाचा शेअर 0.95 टक्क्यांनी, ट्रेंटचा शेअर 0.86 टक्क्यांनी, टाटा पॉवरचा शेअर 0.53 टक्क्यांनी, इंडियन हॉटेल्स कंपनीचा शेअर 0.52 टक्क्यांनी, टाटा कम्युनिकेशन्सचा शेअर 0.37 टक्क्यांनी आणि टायटनचा शेअर 0.18 टक्क्यांनी घसरला.
या कंपन्यांच्या एकत्रित बाजारमूल्यात 45,615.67 कोटी रुपयांची घट झाली. एकट्या टीसीएसला 32,743.69 कोटी रुपयांचा फटका बसला.
मुंबई शेअर बाजारचा सेन्सेक्स 187.90 अंकांनी, म्हणजेच 0.24 टक्क्यांनी घसरून 77,966.35 वर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजारचा निफ्टी 35.75 अंकांनी, म्हणजेच 0.15 टक्क्यांनी घसरून 24,435.95 वर बंद झाला.
चंद्रशेखरन राजीनाम्यानंतर टाटा समूहाच्या शेअर्सवर दबाव आला, ज्यामुळे व्यापक बाजाराच्या तुलनेत लार्ज-कॅप शेअर्सची कामगिरी खालावली, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्यानंतर टाटा समूहाच्या शेअर्सवर दबाव आला आणि टीसीएसच्या शेअरमध्ये सुमारे 4 टक्क्यांची घसरण झाली, असे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागाचे संशोधन प्रमुख सिद्धार्थ खेमका म्हणाले.
टाटा समूहात 40 वर्षे घालवलेल्या 63 वर्षीय चंद्रशेखरन यांनी बुधवारी सांगितले की, 20 फेब्रुवारी 2027 रोजी त्यांचा कार्यकाळ संपल्यावर ते पुनर्नियुक्तीसाठी स्वतःहून पुढे येणार नाहीत, असे त्यांनी टाटा सन्सच्या संचालक मंडळाला कळवले आहे. सुलभ संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी संचालक मंडळाने लवकरच उत्तराधिकार्याची निवड करावी, अशी विनंती त्यांनी केली.





