ढाका : बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे प्रभारी अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान गुरुवारी मायदेशी परतणार आहेत. गेल्या १७ वर्षांपासून रहमान लंडनमध्येच वास्तव्यास आहेत. खालिदा झिया यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर ढाक्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच बांगलादेशात फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये बीएनपी हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून निवडणुकीनंतर संभाव्य पंतप्रधान म्हणून तारिक रहमान हे प्रमुख दावेदार आहेत. त्यामुळे ६० वर्षीय रहमान यांनी आपला विजनवास समाप्त करून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. रहमान लंडनमधील हिथ्रो विमानतळावरून बांगलादेश एअरलाइन्सच्या विमानाने पत्नी डॉ. झुबेदा रहमान आणि कन्या झायमा रहमान यांच्यासह उद्या (गुरुवारी) मायदेशी परतणार आहेत, असे एका स्थानिक वर्तमानपत्राने म्हटले आहे. ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उद्या दुपारी त्यांचे आगमन होणार आहे. बीएनपीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून रहमान यांचे स्वागत करण्याचे ठरवले आहे. त्यांच्या स्वागतासाठी आयोजित केल्या गेलेल्या कार्यक्रमात रहमान यांचे भाषणही होणार आहे. बाशुंधरा येथील एव्हरकेअर रुग्णालयात जाऊन ते मातोश्री खालिदा झिया यांच्या प्रकृतीची विचारपूसही करणार आहेत. याशिवाय गेल्या वर्षी डुलैमध्ये झालेल्या उठावादरम्यान जखमी झालेल्यांना भेटण्यासाठी ते नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ट्रॉमॅटोलॉजी ऍन्ड ऑर्थोपेडिक रिहॅबिलीटेशन सेंटरलाही भेट देणार आहेत. रहमान यांच्या आगमनामुळे विमानतळावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून सामान्य नागरिकांसाठी विमानतळावर आजपासूनच प्रवेशास मर्यादा असणार आहेत.