सामनातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा,”कलंक” मतीचा झडो..!’

मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असल्याचे दिसत आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या सभेत फडणवीस यांच्या भाषणाची एक क्लिप ऐकवली आणि त्यांचा उल्लेख ‘नागपूरचा कलंक’ असा केला.
या टीकेचा पलटवार करत देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप ट्वीट केली आणि आठ मुद्द्यांमध्ये त्यांना उत्तर दिलं आहे. अशात भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर जहरी टीका करण्यात आली अशात आता आजच्या सामनाच्या अग्रलेखातून याच मुद्द्यावर भाष्य करण्यात आलं आहे. ‘कलंक’ मतीचा झडो!, या शीर्षकाखाली हा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे.
काय आहे सामनाचा अग्रलेख
फडणवीस म्हणतात, ‘ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचे आरोप केले त्यांच्या पंक्तीला बसणे हे बरे आहे काय?’ देवेंद्रजी, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला तर बरे होईल. शिंदे-मिंधे गटातील आमदार, खासदारांचे हात व तोंड शेणाने बरबटले आहेच.
आता अजित पवारांचे चक्की पिसिंग, हसन मुश्रीफांचा घोटाळा,भुजबळ – हर्षवर्धन पाटलांपासून ते राहुल कुलपर्यंत हजारो कोटींच्या घोटाळय़ांचे शेण सरकारच्या तोंडात गेले आहे. महाराष्ट्राने संस्कृतीच्या बाबतीत नेहमीच फुले वेचली तेथे गोवऱया वेचण्याची वेळ महाराष्ट्रावर ज्यांनी आणली त्यांची घाणेरडी वकिली फडणवीस करीत आहेत. म्हणूनच तुम्ही कलंकित आहात! ईश्वर तुम्हाला सुबुद्धी देवो. ‘कलंक’ मतीचा झडो इतकीच प्रार्थना!
सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो ‘कलंक’ मतीचा झडो विषय सर्वथा नावडो सदन्घ्री ‘कमळी’ दडो मुरडीता हटाने अडो वियोग घडता रडो मन भव्त्चरित्री जडो – मोरोपंत (केकावली)
महाराष्ट्रातील संस्कृती ‘कलंकित’ करण्याचा विडा काही लोकांनी स्वीकारला आहे. त्यांच्यासाठी मोरोपंतांच्या या ओळी मार्गदर्शक ठराव्यात. काही लोकांची मती कलंकित झाली आहे आणि त्यांची कलंकित मती हेच महाराष्ट्राचे ज्ञान, शहाणपण व मास्टर स्ट्रोक असा काही जणांनी समज करून घेतला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘मास्टर स्ट्रोक’ मारतात असे त्यांचे पगारी भगतगण नेहमी सांगतात. लोकमान्य टिळक सांगायचे, एक आण्याचा गांजा, चिलीम मारली की भरपूर कल्पना काही लोकांना सुचतात. भाजपच्या पगारी भजनी मंडळाचे तसेच आहे.
नागपूरही आता खऱ्या संघ विचारांचे उरलेले नाही. तेथे भेसळच फार झाली आहे. क्षणभंगूर सत्ता संपादनासाठी भ्रष्टाचारी लोकांशी शय्यासोबत करण्यास नैतिकतेचे बिरुद मिरवणाऱयांनाही लाज वाटत नाही. अजित पवार, मुश्रीफ, गोंदियाचे पटेल, भुजबळ हे कलंकित की स्वच्छ राजकीय चारित्र्याचे हे फडणवीसांनी जाहीर करावे.
फुटलेल्या शिवसेना आमदारांवरील ‘ईडी’ कारवाईच्या फायली कोणत्या बैलांच्या गोठय़ात दडपून त्यावर शेणसडय़ांनी सारवण केले तेसुद्धा सांगा. महाराष्ट्राच्या संस्कृती व परंपरेची माहिती नसलेले लोक सत्तेवर विराजमान झाले.
महाराष्ट्राने संस्कृतीच्या बाबतीत नेहमीच फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचण्याची वेळ महाराष्ट्रावर ज्यांनी आणली त्यांची घाणेरडी वकिली फडणवीस करीत आहेत. म्हणूनच तुम्ही कलंकित आहात! ईश्वर तुम्हाला सुबुद्धी देवो. ‘कलंक’ मतीचा झडो इतकीच प्रार्थना!





