पंजाबमध्ये टार्गेट किलिंगचा डाव उधळला; 3 दहशतवादी पोलिसांच्या जाळ्यात

चंदिगढ – पंजाबमध्ये बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) या संघटनेशी संबंध असणाऱ्या दहशतवादी गटातील तिघांना अटक करण्यात आली. त्यामुळे टार्गेट किलिंगचा मोठा डाव उधळला गेल्याचा दावा पोलिसांनी केला.
दहशतवादी जाळ्याच्या सक्रियतेविषयीची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे विशेष मोहीम राबवून पोलिसांनी तिघांना पकडले. जगरूप सिंग, सुखजित सिंग आणि नवप्रित सिंग अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडील पिस्तुल आणि काडतुसांचा साठा जप्त करण्यात आला. त्यांच्या प्राथमिक चौकशीतून टार्गेट किलिंगचा कट उघड झाला. पंजाबमध्ये दहशत पसरवण्यासाठी काही विशिष्ट व्यक्तींची हत्या करण्याचे त्यांचे मनसुबे असल्याचे समोर आले.
उघडकीस आलेले दहशतवादी जाळे अमेरिकास्थित गँगस्टर गुरप्रित सिंग चालवत होता. तो पाकिस्तानस्थित दहशतवादी हरविंदरसिंग रिंदा याचा निकटचा साथीदार आहे. संबंधित दहशतवादी जाळ्याची सुत्रे ग्रीसस्थित लाडी बकापुरिया याच्याकडेही असल्याचे समजते. अटक करण्यात आलेल्यांची विविध यंत्रणा कसून चौकशी करणार आहेत. त्या चौकशीतून आणखी काही कारनामे उघड होण्याची शक्यता आहे.





