Tara Sutaria: ‘टॉक्सिक’मधून समोर आला तारा सुतारियाचा धडाकेबाज लूक; यशच्या २०० कोटींच्या चित्रपटात नवी नायिका

Tara Sutaria : अभिनेता यश यांचा आगामी चित्रपट ‘टॉक्सिक’मधील कलाकारांचे लूक एकामागोमाग एक समोर येत असून, आता अभिनेत्री तारा सुतारिया हिचा पहिला लूक रिलीज करण्यात आला आहे. या लूकमध्ये तारा अतिशय आकर्षक आणि ताकदवान भूमिकेत दिसत असून, चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तारा ‘रेबेका’ या भूमिकेत दिसत आहे. तिचा लूक थोडासा विस्कटलेला असला तरी, तो तिच्या व्यक्तिरेखेतील ताकद आणि आत्मविश्वास दाखवतो. ही भूमिका कमकुवतपणावर मात करून स्वतःची ताकद दाखवणारी असल्याचा अंदाज लावला जात आहे.
याआधी या चित्रपटातून नयनतारा, कियारा अडवाणी आणि हुमा कुरैशी यांच्या भूमिका समोर आल्या होत्या. या सर्वांनंतर आता तारा सुतारियाची एंट्री झाल्याने चित्रपटाची चर्चा आणखी वाढली आहे. ‘टॉक्सिक’चा अंदाजे बजेट सुमारे २०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
तारा सुतारियाचा प्रवास
तारा सुतारियाने २०१९ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटासाठी तिला बेस्ट डेब्यूचा झी सिने अवॉर्डही मिळाला. त्यानंतर तिने ‘मरजावां’, ‘हिरोपंती २’, ‘एक विलन रिटर्न्स’ अशा अॅक्शन चित्रपटांत काम केले. २०२३ मध्ये आलेल्या ‘अपूर्वा’ या थ्रिलर चित्रपटातील तिच्या अभिनयाचे समीक्षकांनी कौतुक केले होते. ‘टॉक्सिक’ हा तारा सुतारियाचा पहिला पॅन इंडिया चित्रपट आहे.
View this post on Instagram
‘केजीएफ’नंतर यशची मोठी झेप
कन्नड सिनेसृष्टीतील अभिनेता यशने ‘केजीएफ’ मालिकेमुळे पॅन इंडिया स्टारडम मिळवले. ‘केजीएफ: चॅप्टर १’ आणि ‘केजीएफ: चॅप्टर २’ मधील रॉकी भाईची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. ‘केजीएफ २’ हा चित्रपट आजवरच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक ठरला आहे.
‘टॉक्सिक’ चित्रपटाविषयी
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नावाजलेली दिग्दर्शिका गीथू मोहनदास हिच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला ‘टॉक्सिक’ हा कन्नड सिनेसृष्टीतील महत्त्वाकांक्षी चित्रपट मानला जात आहे. यश आणि गीथू मोहनदास यांनी मिळून या चित्रपटाची कथा लिहिली आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट कन्नड आणि इंग्रजी भाषेत एकाच वेळी लिहिला आणि चित्रीत करण्यात आला असून, तो हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम आदी भाषांमध्ये डब केला जाणार आहे.
‘टॉक्सिक’ची रिलीज डेट
केव्हीएन प्रोडक्शन्स आणि मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या बॅनरखाली तयार होणारा ‘टॉक्सिक’ चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी, ईद, उगादी आणि गुढीपाडव्याच्या सणांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.





