Dinanath Mangeshkar Hospital | पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तनिषा यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाने पैशांअभावी उपचार नाकारल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने कुटुंबीय दिशाभूल करणारे आरोप करीत असून जमेल तेवढे पैसे भरुन पेशंटला दाखल होण्याचा सल्ला रुग्णाला दिला होता. पण तो रुग्णाने पाळला नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनुजा जोशी, अतिदक्षता विभागप्रमुख डॉ. समीर जोग, प्रशासक सचिन व्यवहारे यांनी या प्रकरणाची चौकशी केली. या चौकशीत तनिषा भिसे या २०२० पासून या रुग्णालयात उपचारासाठी येत होत्या. २०२२ मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली होती. या शस्त्रक्रियेसाठी त्यांना ५० टक्के सूट देण्यात आली होती. तर २०२३ मध्ये सुखरुप गर्भधारणा आणि प्रसूतीची शक्यता कमी असल्याने त्यांना मुल दत्तक घेण्याचाही सल्ला देण्यात आला होता. असे अहवालात म्हटले आहे. पतीने फोनच उचलला नाही आवश्यक प्रसूतिपूर्व तपासणी त्यांनी दीनानाथ रुग्णालयात केलेली नाही. १५ मार्च रोजी त्या इंदिरा आयव्हीएफचे रिपोर्ट घेऊन डॉ. सुश्रुत घैसास यांना भेटल्या होत्या, असे देखील अहवालात म्हटले आहे. २८ मार्च रोजी त्या रुग्णालयात आल्या तेव्हा त्यांना तातडीची उपचाराची गरज नव्हती. प्रसुतीनंतर बालकांना अतिदक्षता विभागात उपचार देण्यासाठी १० ते २० लाख रुपयांचा खर्च येऊ शकतो, असे डॅा. केळकर यांनी सांगितले. तसेच जमेल तेवढे पैसे भरा असे देखील म्हटले होते. मात्र, रुग्णाचे नातेवाईक चॅरिटी विभागात कोणालाही भेटले नाहीत. डॉ. घैसास यांनी रुग्णाच्या पतीला फोन केला. त्यांनी फोन उचलला नाही, असे अहवालात म्हटले आहे.