Tamilnadu Government : तमिळनाडू सरकार कोसळणार? राजकारणात मोठी खळबळ
तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळातून (Tamilnadu Government) एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे.

Tamilnadu Government : तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळातून (Tamilnadu Government) एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकचे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी विद्यमान मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या सरकारबाबत एक अतिशय मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे.
मागच्या महिन्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेतून पायउतार व्हावे लागलेले एम.के. स्टॅलिन सध्या आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहेत. पक्षाच्या एका जाहीर कार्यक्रमात बोलताना (Tamilnadu Government) त्यांनी थेट भाकीत वर्तवले आहे की, मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार जास्त काळ टिकणार नाही आणि ते लवकरच कोसळू शकते. इतकेच नव्हे तर, येत्या तीन ते सहा महिन्यांत तमिळनाडूमध्ये पुन्हा एकदा विधानसभा निवडणुका होऊ शकतात, असा दावाही त्यांनी केला आहे.
आपल्या या दाव्याच्या समर्थनार्थ बोलताना स्टॅलिन यांनी विधानसभेतील संख्याबळाचे गणित सविस्तरपणे मांडले. तमिळनाडूची विधानसभा एकूण २३४ सदस्यांची असून, राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आणि बहुमताचा आकडा गाठण्यासाठी किमान ११८ जागांची आवश्यकता असते.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत थलपती विजय यांचा ‘टीव्हीके’ (TVK) हा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून नक्कीच समोर आला, परंतु त्यांना स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही. टीव्हीके पक्षाला केवळ १०८ जागांवर विजय मिळवता आला, जो बहुमताच्या आकड्यापेक्षा १० जागांनी कमी आहे.
या परिस्थितीमुळे विजय यांनी काँग्रेस, आययूएमएल (IUML) आणि व्हीसीके (VCK) या इतर मित्रपक्षांचा पाठिंबा घेऊन राज्यात आघाडी सरकार स्थापन केले. याच मुद्द्यावर बोट ठेवत स्टॅलिन यांनी जोरदार टीका केली असून, हे सरकार स्वतःच्या बळावर उभे नसून इतर पक्षांच्या कुबड्यांवर आणि आधारावर टिकून आहे, त्यामुळे ते कधीही पडू शकते असे म्हटले आहे.
राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका जाहीर होऊ शकतात ही शक्यता गृहीत धरून एम.के. स्टॅलिन यांनी आपल्या द्रमुक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आत्तापासूनच सज्ज राहण्याचे कडक आदेश दिले आहेत. निवडणुका कधीही, अगदी तीन महिन्यांत किंवा सहा महिन्यांतही लागू शकतात, त्यामुळे गाफील न राहता कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
या राजकीय दाव्यांसोबतच स्टॅलिन यांनी थलपती विजय यांच्या सरकारवर इतर आघाड्यांवरूनही तीव्र हल्ला चढवला. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे कोलमडली असल्याचा आरोप त्यांनी केला, तसेच सध्याच्या राजवटीत महिला आणि लहान मुलांवरील गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय, राज्यात सध्या अघोषित वीज कपात सुरू असून, सरकारच्या चुकीच्या आणि धरसोड आर्थिक धोरणांमुळे मोठ्या उद्योगांनी तमिळनाडूतून काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे, असे म्हणत त्यांनी विजय सरकारला चौफेर घेरले आहे.






