बंगळुरू : कॉंग्रेसशासित कर्नाटकमध्ये नेतृत्वबदलाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी त्यांची भूमिका स्पष्ट केली. नेतृत्वबदलाविषयी कॉंग्रेस श्रेष्ठींचा निर्णय अंतिम असेल. श्रेष्ठींच्या आदेशाचे आम्ही पालन करू, असे त्यांनी नमूद केले. सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्यात सुप्त सत्तासंघर्ष सुरू असल्याचे बोलले जाते. त्यासाठी सत्तावाटपाचा कथित फॉर्म्युला कारणीभूत असल्याची कुजबूज आहे. कर्नाटक राज्यात मे २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये कॉंग्रेसने बाजी मारली. मात्र, मुख्यमंत्री निवडीवरून पेच निर्माण झाला. सिद्धरामय्या आणि शिवकुमार या तगड्या दावेदारांमुळे ती स्थिती उद्भवली. पक्षश्रेष्ठींनी सिद्धरामय्या यांना पसंती देताना शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री बनवत त्यावेळी तोडगा काढला. मात्र, अडीच वर्षांनंतर म्हणजे निम्मा कार्यकाळ झाल्यावर मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय त्यावेळी झाल्याचे सांगण्यात येते. अर्थात, त्या फॉर्म्युल्याविषयी जाहीर भाष्य कॉंग्रेसच्या गोटातून करण्यात आलेले नाही. पण, खरोखरीच तसा फॉर्म्युला ठरला असल्यास चालू वर्षीच्या अखेरीस मुख्यमंत्री बदल करणे क्रमप्राप्त ठरेल. बहुधा तो विचार करून कर्नाटक कॉंग्रेसमधून प्रतिक्रिया पुढे येऊ लागल्या आहेत. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सुत्रे जातील, असा छातीठोक दावा एका आमदाराने नुकताच केला. माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांनी रविवारी केलेल्या वक्तव्यामुळे नेतृत्वबदलाच्या चर्चांना आणखीच खतपाणी मिळाले. कर्नाटकमधील प्रभावी नेते अशी शिवकुमार यांची प्रतिमा बनली आहे. त्यांना मुख्यमंत्री बनण्यापासून कुणी रोखू शकत नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. साहजिकच, कर्नाटकात नेतृत्वबदलाची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आल्याचे दिसून येत आहे. त्यावर आता सिद्धरामय्या यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली. मात्र, शिवकुमार यांनी नेतृत्वाबदलाविषयी जाहीर भाष्य न करण्याचे धोरण स्वीकारलेले दिसते. मोईली यांच्या वक्तव्याविषयी पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी कुठली प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मोईली यांचे मत व्यक्तिगत असल्याचे त्यांनी म्हटले.