Pune Congress State President : आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुण्यातील काँग्रेसच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अंतर्गत गटबाजी थांबून कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पुणे काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी लावून धरलेल्या मागणीबाबतही अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.आगामी निवडणुकींसाठी एकदिलाने कामाला लागण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहराध्यक्ष बदलण्याची मागणी पुणे काँग्रेसमधील दोन गटांनी लावून धरली होती. अखेर प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. यामुळे शहराध्यक्ष बदलाच्या सुरू असलेल्या चर्चांना आता फुलस्टॅाप लागला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत पक्षातील वरिष्ठांकडून शहराध्यक्ष पदी अरविंद शिंदे हेच असणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहेत. यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी शहराध्यक्ष बदलाची शक्यता धूसर झाली आहे. या बैठकीत महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक प्रभागांमध्ये उमेदवार देण्याबाबत चाचपणी करण्याच्या सूचना स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत. स्वबळावर निवडणूक लढविण्याची वेळ आली तर त्या पद्धतीची तयारी ठेवावी, अशी सूचना देखील या बैठकीत करण्यात आली आहे. यांच्यावर सोपविण्यात आली जबाबदारी स्थानिक वरिष्ठ नेत्यांना महापालिका विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर दुसऱ्या फळीतील नेत्यांवर देखील काही प्रभागांची जबाबदारी देण्यात येणार आहे. जर काही नेते एखाद्या उमेदवाराच्या तिकिटासाठी आग्रही असतील तर त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी त्या नेत्याला घ्यावी लागणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले आहे. हेही वाचा: अखेर पितळ उघडं ! “खलिस्तान्यांनी कॅनडामधूनच रचले सर्व भारतविरोधी कट” ; पहिल्यांदाच CSIS च्या अहवालात खुलासा