Harshvardhan Sapkal : “वक्तव्य करण्याआधी आपल्या वडिलांशी चर्चा…” ; मंत्री नितेश राणेंना हर्षवर्धन सपकाळांनी लगावला खोचक टोला

Harshvardhan Sapkal : आज मनोज जरांगे यांच्या बेमुदत आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. आझाद मैदानावर गेल्या चार दिवसांपासून मराठा आंदोलक ठिय्या मांडून बसले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी निर्णय घेत आझाद मैदान रिकामं करण्याची नोटीस मनोज जरांंगे यांना बजावली आहे.
या नोटीसीनंतर मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे. हे सगळं घडत असताना राज्यातील मराठा आंदोलकांकडून जरांगेंनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच मराठा आंदोलनाला घेऊन अनेक नेत्यांची वक्तव्य देखील समोर आली आहेत.
मराठा आरक्षणावरून टीका करणाऱ्या मंत्री नितेश राणेंचा चांगलाच समाचार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतला आहे. नितेश राणे यांनी वक्तव्य करण्याआधी आपल्या वडिलांची चर्चा केलेली बरी राहील, असा खोचक टोला त्यांनी लगाविला आहे. नारायण राणे हे देखील मराठा समाजाला आरक्षणाबाबतच्या एका समितीचे सदस्य होते, असं देखील सपकाळ यांनी म्हटलं आहे.
दोन समाजांमध्ये तेढ निर्माण तर करायचा नाही ना?
मराठा आरक्षण आंदोलनाच्या प्रश्नावर राज्य शासन जी भूमिका घेत आहे, त्यावर सगळ्यांनाच संभ्रम आहे. मुख्यमंत्र्यांना राज्यात तणाव निर्माण करून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण तर करायचा नाही ना? असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला आहे. शासनाने स्थापन केलेल्या उपसमितीलाही जर निर्णय घेता येत नसेल, तर त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे हे स्पष्ट करावे, असं देखील सपकाळ यांनी म्हटलं आहे.
सपकाळ यांनी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या गंभीर विषयावर भारतीय जनता पक्ष वेळकाढूपणा करीत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. यामुळे आता सपकाळ यांनी केलेल्या आरोपांवर भाजप काय प्रत्तुतर देणार हे पाहणं लागेल. पुढं ते म्हणाले, या संदर्भात भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकारने तातडीने पावले उचलावीत.
तीन महिने अगोदर राज्य सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची भूमिका आणि इशारा दिला होता. राज्य सरकारला तीन महिन्यात निर्णय घेता येत नाही तर या सरकारने आंदोलनाच्या तीन दिवसात निर्णय घ्यावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.





