बीड पोलीस स्टेशनमध्ये पाच पलंग मागवल्याची चर्चा; कराडच्या कोठडीनंतर रोहित पवार म्हणाले “एवढीच तत्परता…”

Rohit Pawar | बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीला आता वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराड याला अटक करावी अशी मागणी केली जात होती. वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे.
अखेर 22 दिवसानंतर वाल्मिक सीआयडी समोर मंगळवारी पुण्यात शरण आला. त्यानंतर त्याला बीड जिल्ह्यातील केज इथं हलवण्यात आलं. चौकशीनंतर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. सीआयडीसह आता एसआयटी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करत आहे.
यातच आता वाल्मिक कराड असलेल्या बीड पोलीस ठाण्यात 5 नवीन पलंग मागवण्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बीड पोलीस स्टेशनसंदर्भात केलेले ट्विट चर्चेत आले आहे.
रोहित पवारांचं ट्विट
“बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत. नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी शिवाय गादी-उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा,” असं रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे.
#बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत.
नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 1, 2025
रोहित पवार यांनी वाल्मिक कराड तुरूंगात गेल्यावरच पलंग कसे मागवले? असा सवाल केला आहे. त्यावरून वाल्मिक कराडांसाठी तर हे पलंग मागवले नाहीत ना? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सरकारकडून SIT स्थापन
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सरकारकडून SIT स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये IPS बसवराज तेलींसह 10 पोलीस अधिकारी असणार आहेत. आयपीएस बसवराज तेली हे या समितीचे नेतृत्व करणार आहेत. बसवराज तेली सीआयडीमधील आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख आहेत.
एसआयटीमध्ये सर्वच अधिकारी बीड जिल्ह्यातले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी डॉ. बसवराज तेली (भा.पो.से.), पोलीस उपमहानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा (EOW), सी. आय. डी., पुणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.
हेही वाचा:




