तळीरामांचा प्रताप! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगलामध्ये आग; अर्धा हेक्टर जंगल जळून खाक

Mumbai News | मुंबईच्या बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आग लागली आहे. राष्ट्रीय उद्यानाच्या लगतच असणाऱ्या दहिसर परिसरात धुलीवंदनाच्या सणाचा आनंद लुटण्यासाठी काही तळीराम एकत्र जमले होते. यातील दारूच्या नशेत तळीरामांनी ही आग लावल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आगीत राष्ट्रीय उद्यानाचे अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.
अचानक शुक्रवारी रात्री सहाच्या सुमारास दहिसर नॅशनल पार्कच्या जंगलामध्ये मोठ्या आगीचे लोट दिसले. यानंतर अनेकांनी तिथून पळ देखील काढला. ज्यावेळी ही आग लावण्यात आली, त्यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सुरक्षारक्षक उपस्थित होते. मात्र, आगीचे लोट दिसल्यानंतर घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, ही आग तळीरामांकडून लावण्यात आली होती.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मोठे प्रयत्न करून अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. जवळपास दीड तासांच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवता आले. वनक्षेत्र अधिकारी आणि वन कर्मचारी देखील आग विझवण्यासाठी पोहोचले होते. अग्निशमन दल घटनास्थळी वेळेवर पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. आता ही आग नेमकी कोणी लावली याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
हेही वाचा:
Bengal Violence : पश्चिम बंगालमध्ये हिंदू मंदिरांवर हल्ले; भाजपाने शेअर केले हिंसाचाराचे फोटो





