Bengal Violence | Nandigram : होळीच्या दिवशी (दि. १४ मार्च) पश्चिम बंगालमध्ये अशांतता दिसून आली. नंदीग्रामचे भाजप आमदार शुभेंदप अधिकारी यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या मतदारसंघात शुक्रवार, १४ मार्च २०२५ रोजी हिंदू मूर्ती तोडफोडीची घटना घडली. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते अमित मालवीय यांनीही सोशल मीडियावर या घटनेचा निषेध करत पोस्ट केली आहे. अमित मालवीय यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर सतत हल्ले होत आहेत. नंदीग्राम ब्लॉक २ मधील अहमदाबाद परिसरातील कमलपूर येथील स्थानिक रहिवासी गेल्या मंगळवारपासून पूजा आणि प्रार्थना करत होते, परंतु पूजा आणि राम नारायण कीर्तन अखंडपणे सुरू असताना, काही लोकांना श्री रामाच्या नावाचा जप सहन झाला नाही आणि त्यांनी त्या जागेची तोडफोड केली आणि मूर्तींची विटंबना केली. ते म्हणाले, ‘बरुईपूर, जाधवपूर आणि मुर्शिदाबादसह राज्यभरात अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. शिवाय, ममता बॅनर्जी यांच्या पोलिसांनी बंगालच्या काही भागात होळी साजरी करण्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला परंतु नंतर त्यांनी माघार घेतली. सनातनींमध्ये व्यापक संताप आहे, परंतु या कठीण काळात भाजप बंगाल त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. आम्ही ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालला दुसरे बांगलादेश बनवू देणार नाही. अशी टीका त्यांनी केली. इंटरनेट सेवा केली बंद : पश्चिम बंगालमधील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, बीरभूम जिल्ह्यातील सैंथिया शहरातील किमान ५ ग्रामपंचायती भागात १७ मार्च २०२५ पर्यंत इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, अफवा आणि बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. बीरभूममध्ये दगडफेकीच्या घटनेची बातमी आल्यानंतर, प्रभावित भागात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. यापूर्वी देखील घडला हिंसाचार : यापूर्वी ९ मार्च २०२५ रोजी भाजप नेते दिलीप घोष यांनी एका घटनेची माहिती देताना पश्चिम बंगालमधील बसीरहाट शहरातील शंखचुरा बाजार येथील काली मंदिराची तोडफोड आणि हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती तोडल्याची माहिती दिली होती. घोष यांनी दावा केला की मंदिरावरील हल्ला तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेते शाहनूर मंडल यांनी केला होता.