पंजशीर प्रांतावर तालिबान्यांचा ताबा; 20 वर्षांपूर्वी सत्ता असतानाही जिंकता आला नव्हता हा भाग

काबूल – अफगाणिस्तानातील पंजशीर प्रांत अजूनपर्यंत तालिबान विरोधकांच्या ताब्यात होता. तथापि आज त्यांनी त्या प्रांतावर ताबा मिळवल्याचे वृत्त आहे. पण तालिबान विरोधकांनी मात्र हा दावा खोडून काढला आहे.
1996 ते 2001 या अवधीत तालिबानची अफगाणिस्तानवर सत्ता असतानाही त्यांना हे खोरे जिंकता आले नव्हते. गेले काही दिवस तालिबान्यांनी त्या भागावर हल्ले चढवून तो काबीज करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना तेथे प्रखर विरोधाचा सामनाहीं करावा लागला. या संघर्षात सुमारे पाचशे तालिबानी गनिमांना आपले प्राण गमवावे लागल्याचे वृत्त होते. तथापि आज त्यांनी तेथे कब्जा केल्याची घोषणा केली आहे.
ही घोषणा केल्यानंतर तालिबानी गनिमांनी हवेत गोळीबार करून आपला विजय साजरा केला असेही वृत्त आहे. तथापि तेथे तालिबानचे जे विरोधक दबा धरून बसले आहेत त्यांनी मात्र हा प्रांत त्यांच्या ताब्यात गेलेला नाही असे स्पष्ट करीत आपला संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.





