Talera Hospital: महापालिकेचा दावा ठरला फोल! तालेरा रुग्णालयात रक्त तपासणी मशीन पुन्हा बंद; रुग्णांची हेळसांड
Talera Hospital: निकृष्ट दर्जाची यंत्रसामग्री की देखभालीचा अभाव? कोट्यवधींच्या खरेदीनंतरही रुग्णांवर खासगी प्रयोगशाळांमध्ये जाण्याची वेळ.

Talera Hospital – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील तालेरा रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात येथील यंत्रसामग्री वारंवार बंद पडत असल्याने रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गुरुवारी रक्त तपासणीसाठी वापरण्यात येणारे प्रमुख मशीन पुन्हा नादुरुस्त झाल्याने शेकडो रुग्णांची हेळसांड झाली.
वेळेवर रक्त तपासणी न झाल्यामुळे उपचारांनाही विलंब झाला आणि रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून अत्याधुनिक मशिनरी खरेदी केल्याचा गाजावाजा केला होता. मात्र ही यंत्रणा वारंवार बंद पडत असल्याने त्या खरेदीच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दररोज शेकडो रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येतात.
डॉक्टर विविध रक्त तपासण्यांचा सल्ला देतात. परंतु तपासणीची मशीनच बंद असल्याने रुग्णांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते किंवा खासगी प्रयोगशाळांचा पर्याय स्वीकारावा लागतो. विशेष म्हणजे, मशीन बंद पडल्याची माहिती रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यातच आली नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. “एवढ्या छोट्या गोष्टींसाठी साहेबांना सांगत नाही.
आम्ही मशीन दुरुस्त करणाऱ्या तंत्रज्ञांना बोलावले असून ते आले आहेत. लवकरच मशीन सुरू होईल,” असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र रुग्णालयातील अत्यावश्यक वैद्यकीय सेवा खंडित होणे ही “छोटी गोष्ट” कशी असू शकते, असा सवाल आता उपस्थित होत आहे. रुग्णांच्या जिवाशी संबंधित असलेली रक्त तपासणी सेवा वारंवार ठप्प होत असेल,
तर त्याची जबाबदारी कोण घेणार? मशीनचा देखभाल करार, नियमित देखरेख आणि तांत्रिक तपासणी नेमकी कशी केली जाते? निकृष्ट दर्जाची यंत्रणा खरेदी झाली का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे महापालिका प्रशासनाने देणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.




