Talegaon Dhamdhere: तळेगावातील पांढरी वस्तीचा बंधारा फुटण्याच्या मार्गावर? एकमेव मार्ग बंद झाल्याने शेतकरी संकटात
Talegaon Dhamdhere: वेळनदीवरील पांढरीवस्ती के टी बंधाऱ्याचा मातीचा भराव वाहून गेला; शेतकऱ्यांच्या पायी ये-जा करण्याचा एकमेव मार्ग बंद.

Talegaon Dhamdhere – तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील वेळनदीवरील पांढरीवस्ती परिसरातील कोल्हापुरी पद्धतीच्या के टी बंधाऱ्याचा दोन्ही बाजूचा मातीचा भराव नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे बंधारा दोन्ही बाजूंनी मोकळा झाला असून शेतकऱ्यांच्या पायी ये-जा करण्याचा एकमेव मार्ग बंद झाला आहे. या भागातील बहुतांश शेती नदीपलीकडे असून शेतकरीवस्ती नदीच्या अलीकडे आहे.
त्यामुळे नदीपात्रात पाणी असताना शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी या केटी बंधाऱ्यावरून पायी ये-जा करावी लागते. भराव वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे, पिकांची पाहणी करणे, फवारणी, सिंचन व इतर शेतीची कामे करण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे दरवर्षी वेळनदीला पूर आल्यानंतर बंधाऱ्याचा मातीचा भराव वाहून जातो. प्रत्येक वेळी तात्पुरती दुरुस्ती केली जाते; मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने ही समस्या वर्षानुवर्षे कायम आहे.
ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरे यांनी संबंधित पाटबंधारे विभागाकडे अधिकृत पत्राद्वारे बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंचा भराव तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. भविष्यात ही समस्या कायमची दूर करण्यासाठी दगडी संरक्षण भिंत, पिचिंग व मजबूत कायमस्वरूपी भराव उभारण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा बंधारा शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंचा कायमस्वरूपी व भक्कम भराव उभारावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.
पत्र देऊनही चालढकल
वेळ नदीवरील पांढरी वस्ती येथील के टी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंचा मातीचा भराव अतिवृष्टीमुळे वाहून गेला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने संबंधित पाटबंधारे विभाग, पंचायत समिती व महसूल प्रशासनाकडे अधिकृत पत्राद्वारे तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन भरावाचे काम लवकरात लवकर करावे, भविष्यात ही समस्या उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी व भक्कम उपाययोजना करण्याचीही मागणी केली आहे.





