Talegaon Dabhade – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत तब्बल १७५ विषयांवर सखोल वादळी चर्चा करत त्यांना मंजुरी देण्यात आली. विविध विषयांवरील निर्णय प्रक्रियेदरम्यान काही सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत विभाग प्रमुखांवर तीव्र टीका केली. यामुळे सभेचे कामकाज सुमारे सहा तास चालले.नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, पक्षप्रतोद सत्यम खांडगे, गटनेते इंद्रकुमार ओसवाल, गटनेत्या हेमलता खळदे, विरोधी पक्षनेते संतोष भेगडे यांच्यासह मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, उपमुख्याधिकारी ममता राठोड, नगरसेवक सागर बोडके, सुदाम शेळके, दीपक भेगडे, शिवाजी आगळे, सुरज सातकर, मदन नाटेकर, विनोद भेगडे, निखिल भगत, चिराग खांडगे, सिद्धार्थ दाभाडे, सुरज सातकर, नगरसेविका संगीता खळदे, भारती धोत्रे, ऋतुजा भगत, शैलजा काळोखे, सोनाली दरेकर, सुरेखा भेगडे, कमल टकले आदी उपस्थित होते. सभेत बांधकाम विभाग, उद्यान विभाग, पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, कर संकलन विभाग, आस्थापना विभाग, भांडार विभाग, एनयूएलएम विभाग, नगररचना विभाग, मिळकत विभाग, विद्युत विभाग व अग्निशमन विभागाच्या विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. शहरातील बंदिस्त गटारांची उभारणी व दुरुस्ती, विस्कळीत पाणीपुरवठा, अनधिकृत नळ कनेक्शन, वाहतूक समस्या, रस्त्यांचे नूतनीकरण तसेच एसटीपी प्रकल्प यांसारख्या मुद्द्यांवर नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी प्रशासनाच्या कामकाजाबाबत नाराजीही व्यक्त केली. तर विरोधी पक्षनेते संतोष भेगडे यांनी शहरातील अनधिकृत नळ कनेक्शनवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांच्या सुचना अपूर्ण कामे असताना देखील म्हाडाच्या इमारतीच्या योजनांना पूर्णत्वाचे दाखले कसे दिले. त्यामुळे म्हाडाच्या इमारतीमधील कुटुंबांना सांडपाणी व्यवस्था, पाणी आधी अपूर्ण व्यवस्थेमुळे तेथील नागरिकांना त्रास होत असून परिसरातील नागरिकांच्या असंख्य तक्रारी येत आहे. त्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमून त्वरित अहवाल सादर करण्याच्या सुचना उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या कठोर निर्णयांबाबत समाधान व्यक्त यशवंत नगर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक समस्या, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनधिकृत पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झालेल्या आहेत. परंतू याबाबत प्रशासनाने कठोर कारवाईचे निर्णय घेतल्यामुळे नगरसेवक निखिल भगत यांनी समाधान व्यक्त केले आहे. “प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गलथान कामकाजाबद्दल नगरसेवकांनी सभेत दाखल केलेल्या तक्रारींबद्दल कायदेशीर कारवाई केली जाईल. कामात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही.” – गिरीश दापकेकर, मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगर परिषद