Talegaon Dabhade Election: मतदानाची प्रक्रिया दोन टप्प्यांत! नगराध्यक्ष पद २ डिसेंबरला,तर ‘या’ प्रभागांचे मतदान २० डिसेंबरला

प्रभात वृत्तसेवा
तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत न्यायालयीन अपील प्रलंबित असलेल्या काही प्रभागांमधील नगरसेवक पदाच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केल्या आहेत. या प्रभागांमधील मतदान दि. २० डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आले आहे. तर मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र उर्वरित सर्व प्रभागांतील नगराध्यक्ष पद आणि स्थगित न झालेल्या प्रभागांच्या निवडणुका वेळापत्रकानुसार २ डिसेंबरलाच पार पडणार आहेत.
न्यायालयीन अपीलांचे निकाल २३ नोव्हेंबरनंतर मिळाल्यामुळे पुढील प्रभागांतील सदस्य पदाच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रभाग क्रमांक २ अ, प्रभाग क्रमांक ७ अ, प्रभाग क्रमांक ७ ब, प्रभाग क्रमांक ८ अ, प्रभाग क्रमांक ८ ब आणि प्रभाग क्रमांक १० ब या प्रभागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने स्वतंत्र कार्यक्रम जाहीर केला आहे.
स्थगित प्रभागांचा निवडणूक कार्यक्रम ४ डिसेंबर रोजी जाहीर केला आहे. १० डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र माघारी घेता येणार आहेत. ११ डिसेंबररोजी अंतिम उमेदवार यादी आणि चिन्ह वाटप, तर २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. हा निवडणूक निकाल २१ डिसेंबर रोजी लागणार आहे. निवडणुका पुढे ढकलल्यामुळे संबंधित प्रभागातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च वाढणार असून त्यांची प्रचारयंत्रणा सुमारे २० दिवस अधिक ताणली जाणार आहे.
अचानक झालेल्या बदलामुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. तळेगाव दाभाडेतील निवडणुकांचा तणावपूर्ण व गुंतागुंतीचा वातावरणात आता प्रभागनिहाय दोन वेगळ्या तारखांना मतदान प्रक्रियेचे आयोजन करण्यात आल्याने राजकीय समीकरणे कशा दिशेने वळतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





