Talawade Wall Collapse : मृत्यूच्या विळख्यात दांपत्य; तळवड्यातील ‘त्या’ कंपनीत नक्की काय घडलं? वाचा सविस्तर
Talawade Wall Collapse : देहूरोड पोलिसांची मोठी कारवाई; घटनेनंतर ठेकेदाराला अटक, जेसीबी चालकासह तिघांवर गुन्हे दाखल.

Talawade Wall Collapse – तळवडे येथील एका कंपनीत विटांची भिंत बांधण्याचे काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागल्याने भिंत कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास इंडक्शन थरमल कंपनी, ज्योतिबानगर, तळवडे येथे घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांनी ठेकेदाराला अटक केली आहे.
दीपक देवाजी जाधव (वय ३६, रा. खराबवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. त्याच्यासह सदाशिव आगळे (वय ४५, रा. भोसरी) आणि जेसीबी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जखमी कामगार मनोहर भिकु चव्हाण (वय ३६, रा. धाकडे आळी, चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांनी शनिवारी (दि. १४) देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सचिन प्रकाश राठोड (वय ३०) आणि कोमल सचिन राठोड (वय २५, दोघेही रा. चाकण) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या शेडमधील खड्ड्यात भिंत बांधण्याचे काम सुरू असताना कंत्राटदाराने कामगारांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट, जॅकेट किंवा शिडीची कोणतीही व्यवस्था केली नव्हती.
कामगार प्लास्टर करत असताना बाहेरून मातीचा भराव टाकणाऱ्या जेसीबीचा धक्का भिंतीला लागला. यात सचिन राठोड आणि कोमल राठोड या दोघांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. तर फिर्यादी मनोहर चव्हाण हे जखमी झाले. देहुरोड पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.





