Talathi Bharti 2023 : तांत्रिक कारणांमुळे तलाठी भरती परिक्षा लांबणीवर

मुंबई – महाराष्ट्रातील तलाठी भरतीसाठी सोमवारी होणारी परीक्षा तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे कॉंग्रेसने राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की,
राज्य सरकारचे असे बेजबाबदार वर्तन खपवून घेतले जाणार नाही. उमेदवारांनी निराश होऊन टोकाचे पाऊल उचलल्यास राज्य सरकार जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी टीसीएस या संस्थेकडे सोपवण्यात आली आहे. त्या कंपनीने म्हटले आहे की, तांत्रिक टीमनुसार या परिक्षांमध्ये केंद्रीय हार्डवेअर समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे आज या परिक्षा घेण्यात अडचण आली आहे.
वडेट्टीवार यांनी सांगितले की, राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्रे उघडायला हवी होती. त्याऐवजी, त्यांनी फक्त चार केंद्रे स्थापन केली, त्यामुळे इच्छूकांना परीक्षेला बसण्यासाठी लांबचा प्रवास करणे भाग पाडले.खूप अभ्यास करून रात्रीचा दिवस करून मुलांनी या परिक्षेसाठी मेहनत केली होती.
व ते त्यासाठी लांबचा प्रवास करून परिक्षा केंद्रांवर पोहचले होते. तेथे गेल्यावर त्यांना परिक्षा लांबणीवर पडल्याचे समजले त्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य सरकारचे असे बेजबाबदार वर्तन खपवून घेतले जाणार नाही.
एखाद्या उमेदवाराने निराश होऊन आपले जीवन संपवले तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल. सरकारने परीक्षा आयोजित करण्यासाठी कोणतीही पर्यायी तरतूद केलेली नाही, असा दावा वडवेट्टीवार यांनी केला.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, राज्य सरकारने परीक्षा शुल्क म्हणून प्रति उमेदवार एक हजार रुपये आकारले आहेत. सरकारने तलाठी भरती परीक्षा अन्य दिवशी घेण्याचे ठरवले तर पुन्हा परीक्षा शुल्क आकारू नये, अशी मागणीही त्यांनी केली.





