फोटो काढा, हजेरी लावा..!

नगर – सरकारी कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सातत्याने वाढत आहे. कार्यालयीन कामकाज, कर्मचाऱ्यांचे पगार, त्यांची कामावरील हजेरी यांसारखी कामे ऑनलाइन होत आहेत. त्यानंतर आता रोजगार हमी योजनेसारख्या ग्रामीण विकासाच्या योजनांतही ऑनलाइन पद्धतींचा वापर वाढला आहे. केंद्र सरकारने नुकताच एक निर्णय घेतला आहे.
त्यानुसार आता रोजगार हमी योजनेतील मजुरांची हजेरी ऑनलाइन घेतली जाणार आहे. म्हणजे, मजूर कामावर हजर होताना मोबाइल ऍपद्वारे त्याचा फोटो घेतला जाईल तसेच दुपारी तीन ते पाच वाजण्याच्या दरम्यान दुसरा फोटो अशाच पद्धतीने घेतला जाणार आहे. या ऑनलाइन हजेरीला नगर जिल्ह्यात 1 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे.
मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना वगळता सर्वच कामांवरील मजुरांची उपस्थिती “एनएमएमएस ऍप’ द्वारेच नोंदविणे 1 जानेवारी पासून केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यातील जिल्ह्यांना देण्यात आले होते. या आदेशानुसार जिल्ह्यांनी कामकाजात बदल केले आहेत.
1 मे 2022 पासून मनरेगा अंतर्गत ज्या कामांवर 20 व त्यापेक्षा जास्त मजूर उपस्थिती आहे. त्या सर्व कामांवरील मजुरांची उपस्थिती एनएमएमएस ऍपवर नोंदविणे आवश्यक होते. या सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने 1 जानेवारीपासून जिल्ह्यातील मजुरांची हजेरी या नव्या पद्धतीने घेतली जात असल्याचे रोजगार हमी विभागातून सांगण्यात आले.
मजुरांची टंचाई
रोजगार हमी योजनेत याआधी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मजुरांची संख्येत वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र मजुरी कमी मिळत असल्याने मजुरांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. त्यामुळे या योजनेतील कामांसाठी कायमच मजुरांची टंचाई जाणवते, असा अनुभव आहे.





