Gokul Milk Kolhapur : “गोकुळ संघाला एकत्र पुढे न्या” – देवेंद्र फडणवीस

Gokul Milk Kolhapur – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदी नावीद हसन मुश्रीफ यांची निवड काही दिवसांपुर्वी झाली होती. या निवडीनंतर नावीद मुश्रीफ यांनी संचालक मंडळासह मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. महायुती स्वरुपात एकत्र राहून गोकुळला पुढे न्या, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संचालक मंडळासह नावीद मुश्रीफ यांना दिला.
अध्यक्षपदाच्या निवडीवरून गोकुळमध्ये राजकारण चांगलेच तापले होते. तत्कालिन अध्यक्षांनी राजीनामा देण्यास् नाकार दिला होता. त्यानंतर अनेक घडामोडीनंतर नावीद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीनंतर प्रथमच नूतन अध्यक्ष व संचालक मंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते.
यावेळी गोकुळच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा श्री महालक्ष्मी देवीची प्रतिमा, पुष्पगुच्छ व गोकुळची दुग्ध उत्पादने देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, चंद्रदीप नरके, जनसुराज्यचे समित कदम आदी उपस्थित होते.
गोकुळच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्यानंतर फडणवीस यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात येईल, असे आश्वासन दिले. गोकुळच्या भविष्यातील औद्योगिक, ऊर्जा बचत व गुणवत्ता आधारित योजनांवर या वेळी चर्चा झाली. गोकुळचे स्वयंपूर्ण ऊर्जानिर्भरता या बाबतीत राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे फडणवीस यांनी बोलताना स्पष्ट केले.





