’16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकर घ्या’, ठाकरे गटाची झिरवळांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. यानंतर आता ठाकरे गटाने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकर घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. विधानसभा अध्यक्ष परदेशात असल्याने ठाकरे गटाने हे निवेदन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिले आहे. जवळपास 79 पानांचे निवेदन त्यांच्याकडे देण्यात आले आहे.
याबाबत सुनील प्रभू म्हणाले की, “16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर यावर सुनावणी घ्यावी असे म्हटले आहे. आज नरहरी झिरवळ यांची भेट घेऊन त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत आणि अध्यक्षांचे पत्र त्यांच्याकडे देण्यात आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुंबईत नसल्याने हे निवेदन झिरवळ यांच्याकडे देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या चौकटीनुसार लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती आम्ही या निवेदनाद्वारे केली आहे.”
विधानसभा उपाध्यक्षांकडे देण्यात आलेल्या पत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटचा उल्लेख आहे. या जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर सुनावणी घेऊन 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने हे जजमेंट आणि विनंती असे पत्र झिरवळ यांच्याकडे दिले आहे. विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घेतला नाही तर काय करायचे, हे पाहू, असे इशाराही सुनील प्रभू यांनी दिला आहे.





