“‘आप’कडून हिंदुत्वाचे राजकारण, RSS ची विचारसरणी… ; ताहीर हुसेन यांची सडकून टीका

Tahir Hussain । दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. दरम्यान, २०२० च्या दिल्ली दंगलीतील आरोपी आणि माजी नगरसेवक ताहिर हुसेन यांनी बुधवारी मुस्तफाबादमध्ये आपला निवडणूक प्रचार सुरू केला. ताहिर हुसेन हे एआयएमआयएमच्या तिकिटावर मुस्तफाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निवडणूक प्रचारासाठी सहा दिवसांचा कोठडी पॅरोल मंजूर केला आहे. या निवडणूक प्रचारादरम्यान ताहिर हुसेन यांनी तुरुंगात गेल्यानंतर ‘आप’ने त्यांच्याकडे कसे दुर्लक्ष केले. या सर्व मुद्द्यांवर चर्चा केली.
‘आप’ने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले Tahir Hussain ।
यावेळी जेव्हा त्यांना विचारण्यात आले की निवडणूक प्रचारात त्यांना काही अडचण येत आहे का? वेळ आणि पैशाचा अभाव ही समस्या आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात ताहिर हुसेन म्हणाले की, मी सकाळी ९.३० च्या सुमारास येथे (मुस्तफाबाद) पोहोचलो. मी लगेच घरोघरी प्रचार करायला सुरुवात केली. मी फक्त तीन दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर आलो आहे, पण प्रचारासाठी माझ्याकडे फक्त तीन दिवस आहेत असे नाही. माझे कुटुंब आणि समर्थक गेल्या सहा महिन्यांपासून प्रत्येक घरी भेट देत आहेत. सध्या मी एआयएमआयएमचा उमेदवार असलो तरी सुरुवातीला मी तूतुरंगात गेलो त्यावेळी मला वाटलं कदाचित आप सहानुभूती दाखवेल आणि माझ्या पत्नीला तिकीट देईल पण ते घडले नाही. खरं तर, ‘आप’ने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
ते हिंदुत्वाचे राजकारण देखील करतात
पुढे बोलताना विचारसरणी आणि तत्वांच्या बाबतीत तुम्हाला आप आणि भाजपमध्ये काही साम्य आढळते का? या प्रश्नाच्या उत्तरात, मुस्तफाबाद येथील एआयएमआयएमचे उमेदवार ताहिर हुसेन म्हणतात की आम आदमी पक्षाचा जन्म एका चळवळीतून झाला आहे. अण्णा हजारे चळवळीदरम्यान सर्वजण रस्त्यावर होते कारण ते यूपीए सरकारच्या भ्रष्टाचाराला कंटाळले होते. या आंदोलनाचा सर्वाधिक फायदा भाजपला झाला. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण सारखे लोक आम आदमी पक्षात सामील झाले… ते मेहनती आणि प्रामाणिक होते. पण आम आदमी पक्ष अलोकतांत्रिक होत चालला आहे असे त्यांनी म्हटल्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. एका व्यक्तीला एकच पद मिळायला हवे – अशा प्रकारे त्यांना वाटले की लोकशाही टिकून राहील. मी त्यांच्याशी सहमत आहे. आज आम आदमी पक्षात हे घडत आहे का? ही अशी पार्टी आहे जिथे अनेक लोकांना अनेक पदे मिळत आहेत. दुसरे म्हणजे, दिल्लीतील मुस्लिमांना वाटले की ‘आप’ भाजपला रोखण्यास सक्षम आहे. २०१५ आणि २०२० च्या निवडणुकीत ‘आप’ने इतक्या जागा जिंकण्याचे हेच कारण होते. पण आता असे काय झाले आहे की त्यांना (केजरीवाल) अचानक पुजारी आणि ग्रंथींची आठवण आली आहे. केजरीवालांच्या प्रेमाचे आणि बंधुत्वाचे काय झाले? ‘आप’नेही भाजपाप्रमाणे काम करायला सुरुवात केली आहे. ते हिंदुत्वाचे राजकारण देखील करतात… त्यांनी आरएसएसच्या विचारसरणीचे पालन करायला सुरुवात केली आहे. असे म्हणत त्यांनी टीका केली आहे.





