Tahawwur Rana : कडक सुरक्षा, बुलेटप्रूफ कार…; मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड ‘तहव्वुर राणा’ला भारतात आणण्याची तयारी सुरु

Tahawwur Rana : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वुर राणा लवकरच भारतीय भूमीवर येणार आहे. त्याला अमेरिकेतून आणले जात आहे. ज्या विमानातून तहव्वुरला आणले जात आहे ते विमान दिल्लीत उतरेल. दरम्यान, सध्या विमानतळावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. SWAT कमांडो टीम विमानतळावर पोहोचली आहे.
भारतात आल्यानंतर, एनआयए सर्वात तहव्वुर राणाला अटक करेल. त्यानंतर तहव्वुर राणा यांना एनआयए मुख्यालयात नेले जाईल, जिथे त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाईल. त्यानंतर राणाला न्यायालयात हजर करून त्याचा रिमांड मागितला जाईल.
कडक सुरक्षेत राणा यांना दिल्ली विमानतळावरून एनआयए मुख्यालयात नेण्यात येईल. सुरक्षेचे अनेक स्तर असतील. त्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या स्वाट कमांडोच्या सुरक्षेत नेले जाईल. राणांच्या ताफ्याला दिल्ली पोलिसांच्या अनेक गाड्या सुरक्षा देतील. राणा विमानतळावरून बुलेटप्रूफ कारने निघेल.
१६६ जणांना आपला जीव गमवावा लागला :
तहव्वुर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक आहे आणि २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या अमेरिकन नागरिक डेव्हिड कोलमन हेडलीचा तो जवळचा आहे.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी, १० पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या गटाने मुंबईतील एका रेल्वे स्टेशन, दोन हॉटेल्स आणि एका ज्यू केंद्रावर हल्ला केला. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह एकूण १६६ लोक मारले गेले होते.
हे हल्ले १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केले होते. त्याच प्रकरणात, नोव्हेंबर २०१२ मध्ये, पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला पुण्याच्या येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली.
लष्कर-ए-तोयबा आणि हेडलीशी संबंध असल्याने भारत गेल्या अनेक वर्षांपासून राणाला प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहे. राणाने अमेरिकेत त्याच्याकडे उपलब्ध असलेले सर्व कायदेशीर पर्याय वापरुन पाहिले परंतु सर्वत्र त्याला अपयश आले. मात्र, आज अखेर त्याला भारतात आणले जाणार आहे.
ट्रम्प यांची घोषणा…
फेब्रुवारीमध्ये, व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या पत्रकार परिषदेत, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की त्यांच्या प्रशासनाने जगातील सर्वात वांछित व्यक्ती राणा याला भारतात न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्यार्पणाला मान्यता दिली आहे.





