Ram Mandir : रामजन्मभूमीच्या मुख्य पुजाऱ्यांना तहहयात वेतन

अयोध्या – उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी म्हणून गेल्या ३४ वर्षांपासून आयुष्यभर काम करणाऱ्या आचार्य सत्येंद्र दास यांना रामजन्मभूमी ट्रस्ट तहहायात वेतन देत राहणार आहे. मात्र, सत्येंद्र दास यांचे वाढते वय आणि बिघडलेली प्रकृती यामुळे राम मंदिर ट्रस्टने त्यांना कामावरून मुक्त करण्याची विनंतीही केली आहे. पूर्वीप्रमाणेच मुख्य पुजारी यांना हवं तेव्हा राम मंदिरात जाऊन पूजा करण्यावर कोणतेही बंधन नाही.
25 नोव्हेंबर रोजी झालेल्या रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बैठकीत गेल्या 34 वर्षांपासून राम मंदिरात सेवा करणारे आचार्य सत्येंद्र यांना कामावरून मुक्त करण्याची विनंती करण्याचा निर्णय घेण्यात आला. सत्येंद्र दास 87 वर्षांचे झाले आहेत. त्यांची प्रकृतीही आता अनुकूल नाही, त्यामुळे त्यांना सेवेतून मुक्त करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यांना आता जे मानधन दिले जात आहे ते त्यांना आयुष्यभर दिले जाईल, असेही ठरले. ट्रस्टच्या सर्व अधिकाऱ्यांनीही याला सहमती दर्शवली.
आचार्य सत्येंद्र दास 1 मार्च 1992 पासून राम मंदिराचे मुख्य आचार्य म्हणून काम करत आहेत. सुरुवातीला त्यांना 100 रुपये प्रति महिना पगार दिला जात होता. रामललाच्या अभिषेकनंतर त्यांचा पगार 38500 रुपये झाला आहे. आचार्य सत्येंद्र दास यांना आयुष्यभर हा पगार मिळत राहणार आहे. सध्या आचार्य सत्येंद्र दास यांच्यासह एकूण 14 पुजारी राम मंदिरात सेवा करत आहेत. त्यांच्यासोबत चार सहाय्यक पुजारीही दीर्घकाळापासून राम मंदिरात काम करत आहेत, तर नुकतीच नऊ नव्या पुजाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विनाशापासून नवनिर्मितीचे साक्षीदार
रामलल्लाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास बाबरी पाडल्यापासून ते राम मंदिर उभारणीपर्यंतचे साक्षीदार आहेत. राल्लाच्या भव्य मंदिरात श्रीरामाचा अभिषेकही त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे.
28 वर्षे मंडपात राहणाऱ्या रामलल्लाच्या पूजेची जबाबदारी आचार्य सत्येंद्र दास यांनी घेतली होती. यानंतर, त्यांनी सुमारे चार वर्षे तात्पुरत्या मंदिरात मुख्य पुजारी म्हणून रामललाची सेवा केली. रामलल्लाच्या अभिषेकनंतरही ते मुख्य पुजारी म्हणून कार्यरत आहेत.





