T20 World Cup 2021 | विश्वचषकासाठी पाक संघात तीन बदल

लाहोर – आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेला 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांनी यापूर्वीच त्यांच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केलेली आहे.
आयसीसीच्या नियमांप्रमाणे जर संघात काही बदल करायचा असेल, तर तो 10 ऑक्टोबरपूर्वी करता येणार आहे. अशात पाकिस्तानने शनिवारी त्यांच्या संघात 3 बदल केले आहेत. यामध्ये हैदर अली, सरफराज अहमद आणि फखर जमान या तिघांना 15 सदस्यीय संघात संधी दिली गेली आहे.
यापूर्वी संघात संधी दिली गेलेल्या आजम खानला वगळून त्याच्याजागी सरफराज अहमदला संधी मिळाली आहे. तसेच मोहम्मद हसनैनच्या जागी हैदर अलीला सामील केले गेले आहे.
तसेच विश्वचषकासाठी राखीव खेळाडू म्हणून फखर जमानला स्थान देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त शोएब मकसूदला पाठीची दुखापत झाली आहे. त्यामुळे तो या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.





