T20 World Cup 2024 (IND vs IRE) :- भारतीय संघ आजपासून आयर्लंड संघाविरुद्धच्या सामन्यानं T20 विश्वचषकाच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. उभय संघांमधील हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. 2013 पासून भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही आणि संघ या स्पर्धेत विजेतेपदाचा दुष्काळ संपवू पाहणार आहे.
कर्णधार रोहित शर्मासाठी, आयर्लंडविरुद्धचा विजय ही एक मोठी वैयक्तिक उपलब्धी असेल कारण जर भारत हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला, तर रोहित कर्णधार म्हणून टी-20 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार बनेल.
भारतीय संघाचा टी-20 विश्वचषक स्पर्धेत अ गटात समावेश करण्यात आला असून त्यात कॅनडा, अमेरिका, पाकिस्तान आणि आयर्लंडचाही समावेश आहे. यावेळी 20 संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होत असून, त्यांची प्रत्येकी पाच गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर-8 साठी पात्र ठरतील. आयर्लंडनंतर रविवारी न्यूयॉर्कमध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.
‘त्या’ विक्रमापासून रोहित एक पाऊल दूर…
रोहितच्या नेतृत्वाखाली भारताला एकही आयसीसी (ICC) ट्रॉफी जिंकता आली नसली तरी, भारताला आपल्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला मागे सोडण्यापासून तो एक पाऊल दूर आहे. रोहितने आतापर्यंत 54 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये संघाने 41 सामने जिंकले आहेत तर 12 सामने गमावले आहेत. दुसरीकडे, धोनीने 72 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी 41 सामने जिंकले तर 28 गमावले आहेत.
भारतासाठी टी-20 मध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार
महेंद्रसिंग धोनी 41
रोहित शर्मा 41
विराट कोहली 30
हार्दिक पांड्या 10
सूर्यकुमार यादव 05
धोनी आणि रोहितने त्यांच्या नेतृत्वाखाली भारतासाठी खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये समान सामने जिंकले आहेत आणि जर भारत बुधवारी जिंकला तर कर्णधार म्हणून रोहितचा हा 42 वा विजय असेल आणि तो धोनीला मागे टाकून भारतासाठी सर्वात सामने जिंकणारा यशस्वी कर्णधार ठरेल.