T20 World Cup 2024 : विजयाच्या हॅट्ट्रिकसह वेस्ट इंडिजचा सुपर-8 मध्ये प्रवेश; न्यूझीलंडचा 13 धावांनी केला पराभव…

त्रिनिदाद :- टी-20 विश्वचषक 2024 च्या 26 व्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून वेस्ट इंडिज सुपर-8 साठी पात्र ठरले आहे. वेस्ट इंडिजचा हा सलग तिसरा विजय होता, जिथे त्यांनी न्यूझीलंडचा 13 धावांनी पराभव केला. बाद फेरीत (सुपर ८) मध्ये पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे.
शेरफने रूदरफोर्डच्या वादळी 68 धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजने न्यूझीलंड संघाला विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य दिले. 32 धावांवर 5 बळी गमावले असतानाही वेस्ट इंडिजने चांगले पुनरागमन करत धावांचा डोंगर रचला. तर गोलंदाजीत विडींजच्या गोलंदाजांनी लक्ष्याचा बचाव करत बलाढ्य न्यूझीलंडला पराभवाचा मोठा धक्का दिला.
त्रिनिदादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून न्यूझीलंडचा पराभव झाल्याने न्युझीलंड टी-20 विश्वकरंडकातून बाहेर होण्याची वेळ येऊ शकते. न्यूझीलंडने अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरूद्धचा सलग दुसरा सामना गमावल्याने शेवटच्या स्थानी आहेत. विल्यमसनच्या नेतृत्त्वाखालील संघाचे अजून दोन सामने पापुआ न्यु गिनी आणि युगांडा यांच्याविरूद्ध बाकी आहेत. सुपर 8 मध्ये पोहोचायचे असेल तर संघाला हे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. पण जर अफगाणिस्तानने 14 जूनच्या सामन्यात पापुआ न्यू गिनीचा पराभव केला तर न्यूझीलंड संघ अधिकृतपणे वर्ल्डकपमधून बाहेर होईल.
West Indies pull off an incredible win against New Zealand in Trinidad to book their place in the second round of #T20WorldCup 2024 👏 #WIvNZ | 📝: https://t.co/pg3TTownR1 pic.twitter.com/PDY5tbU3og
— ICC (@ICC) June 13, 2024
सुपर 8 फेरीसाठी पात्रतेच्या दृष्टिकोनातून क गटातील गुण तालिकेवर नजर टाकली तर वेस्ट इंडिजचा संघ तीन सामने जिंकून सुपर 8 मध्ये पोहोचला आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी आणि न्यूझीलंडमधील कोणताही एक संघ या गटातून सुपर 8 मध्ये पोहोचेल. सध्या अफगाणिस्तानचा संघ सुपर 8 मध्ये पोहोचण्याची अधिक शक्यता आहे, कारण संघाचा एक सामना नवख्या संघासाठी म्हणजेच पापुआ न्यू गिनी विरुद्ध आहे, ज्याने आधीच दोन सामने गमावले आहेत. याशिवाय वेस्ट इंडिजविरुद्ध एक सामना संघाला खेळायचा आहे. तर युगांडा, पीएनजी आणि न्यूझीलंडचा नेट रन रेट खूपच सुमार आहे. अशा स्थितीत अफगाणिस्तान संघाने आपले दोन्ही सामने जवळच्या फरकाने गमावले तरी ते सुपर 8मध्ये सहज जाऊ शकतो.
त्रिनिदादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना 149 धावा केल्या. 18 व्या षटकातच संघाचे 9 बळी पडले होते आणि त्यावेळी संघाची धावसंख्या फक्त 112 धावा होती, परंतु शेरफेन रदरफोर्डने शेवटच्या दोन षटकात एकट्याने 37 धावा करून सामन्याचे रूप पालटले. त्याचवेळी न्यूझीलंड संघ 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा 20 षटकांत 9 गडी गमावून 136 धावा करता आल्या आणि सामना 13 धावांनी गमावला.
या स्पर्धेतील न्यूझीलंडचा हा दुसरा पराभव असून त्यांचा नेट रन रेट आधीच वाईट आहे. अशा स्थितीत संघ स्वबळावर सुपर ८ साठी पात्र ठरू शकणार नाही. न्यूझीलंडच्या प्रमुख फलंदाजांनी पुन्हा एकदा संघाची निराशा केली. संघाने 5 बळी 63 धावांत गमावले होते. पण ग्लेन फिलिप्स आणि मिचेल सँटनरने शानदार फटकेबाजी केली पण संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. सँटनरने शेफर्डच्या अखेरच्या षटकात तीन षटकार लगावले पण धावा जास्त असल्याने फारसा फरक पडला नाही.
न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्टने 3, टीम साऊदी व लॉकी फर्ग्युसनने प्रत्येकी 2 बळी घेतले. त्याचवेळी 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी न्यूझीलंड संघ मैदानात उतरला तेव्हा संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. मात्र, म्लेन फिलिप्सने 40 धावा आणि मिचेल सँटनरने 21 धावा करून काहीशा आशा उंचावल्या, मात्र अल्झारी जोसेफचे 4 बळी आणि गुडाकेश मोतीने घेतलेल्या 3 बळींमुळे वेस्ट इंडिजने विजय मिळवला आणि सलग तिसरा सामना जिंकण्यात संघाला यश आले. शेवटची दोन षटके न्यूझीलंडसाठी महागडी ठरली, ज्यामुळे सामन्याचा रोख बदलला.
संक्षिप्त धावफलक – वेस्ट इंडिज – 20 षटकांत 9 बाद 149 धावा. (निकोसल पुरन 17, अकिल हुसेन 15, शेफ्रेन रुदरफोर्ड वाबाद 69, ट्रेन्ट बोल्ट 3, टीम साउदी 2-21, लॉकी फर्ग्युसन 2-27). न्यूझीलंड – 20 षटकांत 9 बाद 136 धावा. (ग्लेन फिलिप्स 40, फिन अलन 26, मिचेल सॅंटनर नाबाद 21, अल्झारी जोसेफ 4-19, गुडाकेश मोतीये 3- 25).





