Devon Conway : डेव्हॉन कॉन्वेने रचला इतिहास! एकाच सामन्यात ‘हा’ डबल धमाका करणारा पहिलाच खेळाडू

Devon Conway Record double century and century : न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासात स्टार फलंदाज डेव्हॉन कॉन्वेने आपल्या बॅटने एक सुवर्ण अध्याय लिहिला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात कॉन्वेने अशी कामगिरी केली आहे, जी यापूर्वी न्यूझीलंडच्या कोणत्याही फलंदाजाला जमली नव्हती. एकाच कसोटी सामन्यात द्विशतक आणि शतक झळकावणारा तो न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे.
पहिल्या डावात द्विशतकी धमाका –
वेस्ट इंडिजविरुद्धच्या या निर्णायक सामन्यात कॉन्वेने पहिल्या डावापासूनच पाहुण्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली. त्याने संयम आणि आक्रमकता यांचा सुरेख संगम साधत ३६७ चेंडूंमध्ये २२७ धावांची मॅरेथॉन खेळी केली. या डावात त्याने ३१ चौकार लगावले. कॉन्वेच्या या द्विशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने आपला पहिला डाव ८ बाद ५७८ धावांवर घोषित केला.
दुसऱ्या डावातही शतकी जलवा –
🏟 HISTORY BY DEVON CONWAY
DOUBLE HUNDRED IN THE FIRST INNINGS 💯💯
HUNDRED IN THE SECOND INNINGS 💯
FIRST NEW ZEALAND BATTER TO SCORE A DOUBLE HUNDRED AND A HUNDRED IN THE SAME TEST 🤯🌟#DevonConway #NZvWI pic.twitter.com/K9tjqbWdCz
— Rahul Yadav (@RahulYadav61762) December 21, 2025
कॉन्वेची भूक एवढ्यावरच शमली नाही. दुसऱ्या डावातही त्याने आपला फॉर्म कायम राखत केवळ १३९ चेंडूंमध्ये शानदार शतक ठोकले. या शतकी खेळीत त्याने ८ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार खेचले. एकाच कसोटीत द्विशतक आणि शतक करणे ही क्रिकेट विश्वातील अत्यंत दुर्मिळ कामगिरी मानली जाते. या कामगिरीसह कॉन्वे आता एका खास जागतिक क्लबमध्ये सामील झाला आहे.
हेही वाचा – IND vs PAK Final : भारत-पाक फायनलमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा; खेळाडूंमध्ये भरमैदानात वादावादी, पाहा VIDEO
विक्रमांच्या शिखरावर कॉन्वे –
या संपूर्ण कसोटी सामन्यात कॉन्वेने एकूण ३२७ धावा जमवल्या. एका कसोटीत न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत अव्वल स्थानी स्टीफन फ्लेमिंग (३४३ धावा, विरुद्ध श्रीलंका, २००३) आणि दुसऱ्या स्थानी मार्टिन क्रो (३२९ धावा, विरुद्ध श्रीलंका, १९९१) आहेत.डेव्हॉन कॉन्वेच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे न्यूझीलंडने वेस्ट इंडिजसमोर ३५० पेक्षा अधिक धावांची विशाल आघाडी उभी घेतली असून, सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे.





